Akurdi : ‘रात्रीच्या वेळी काम करुन ध्वनी प्रदूषण करणा-या ठेकेदारावर कारवाई करा’

शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोहननगर, आकुर्डी या भागामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे व्यंकटेश्वरा कन्स्ट्रक्शन या ठेकेदारामार्फत करण्यात येणारे काम रात्रभर चालू असते. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. मोठे-मोठे ट्रक रस्त्यावर रात्रभर ये- जा करतात. याचा स्थानिक रहिवाशांवर विपरीत परिणाम होत आहे.  नागरिकांच्या झोपेमध्ये अडथळा होतो. या ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी. रात्रीच्या वेळी चालणारे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. या कामाचा राडारोडा ठेकेदारांनी सार्वजनिक रस्त्यावर टाकून ठेवला आहे. यामुळे रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य झाले आहे. पादचा-यांना जाण्या-येण्यासाठी रस्ताच उरलेला नाही. या ठिकाणी महापालिकेचे कर्मचाऱ्यांची दररोज ये-जा चालू असते.

तरी देखील या ठेकेदारांना कारवाई का होत नाही?  महापालिकेने याची परवानगी त्यांना दिलेली आहे का ? असा सवाल करत महापालिकेने ठेकेदारांना कडक समज द्यावी. त्यांच्यावर कारवाई करावी. रात्रीच्या वेळी चालणारे काम त्वरित थांबवावे. अन्यथा  शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा नगरसेविका यादव यांनी निवेदनातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.