Pimpri : सत्ताधाऱ्यांच्या मूक संमतीने लागू केलेली करवाढ रद्द करा, खासदार बारणे यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील 2007 पूर्वीच्या दोन लाख 32 हजार मालमत्तांना तिपटीने करवाढ लागू केल्याने सामान्य नागरिकांवर अन्याय होत आहे. या मिळकती जून्या आहेत. महागाई आणि सध्याची परिस्थिती पाहता करवाढीमुळे गरीब नागरिकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहाची मान्यता न घेता सत्ताधा-यांच्या मूक संमतीने केलेली अन्यायकारक करवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

महापालिकेला उत्पन्न वाढीसाठी अनेक स्त्रोत आहे. हजारो मिळकतींची नोंद महापालिकेकडे नाही. अशा मिळकतींची नोंद करुन घ्यावी. त्यांना कराची आकारणी करावी. अनधिकृत नळजोड शोधावेत. त्यांना पट्टी आकारुन उत्पन्न वाढवावे. महापालिकेत सर्रासपणे संगनमत करून  निविदा भरल्या जातात. त्यामध्ये करदात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. या निविदांमधील रिंग थांबवावी.

शहरात विकासाच्या नावाखाली चांगले डांबरी रस्ते खोदून आणि काँक्रीट रस्ते करण्याचा घाट घातला जात आहे. त्यावरील उधळपट्टी थांबविण्यात यावी. नियोजनबद्ध आणि भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभाराला प्राधान्य द्यावे. महापालिकेच्या सभागृहाची मान्यता न घेता सत्ताधा-यांच्या मूक संमतीने केलेली अन्यायकारक करवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.