Bhosari News : ‘भाडेकरार करून घ्या, अन्यथा प्राप्त गाळे काढू; इंद्रायणीनगर येथील गाळेधारकांना महापालिकेची नोटीस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरी-इंद्रायणीनगर भाजी मंडईत 90 गाळे वितरित केले आहेत. त्यापैकी 62 पात्र लाभार्थी निश्‍चित झाले. परंतु, अद्यापही 54 लोकांनी भाडेकरार केलेला नाही. तसेच आठ जणांनी रक्कम भरली नसल्याने त्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. ‘भाडेकरार करून घ्या, अन्यथा प्राप्त गाळे काढून घेण्यात येतील’ असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

सहा महिन्यापूर्वी इंद्रायणीनगर भाजी मंडईमधील 72 गाळे, 18 फळगाळे असे एकूण 90 गाळ्यांची सोडत काढण्यात आली. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, गाळ्यांना अल्प प्रतिसाद आल्याने प्रभाग कार्यालयाकडून त्या परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्‍यावसायिकांची यादी मागविण्यात आली.

त्यानुसार एकूण 62 पात्र लाभार्थी निश्‍चित झाले होते. त्यांना गाळे वितरणाची कार्यवाही झाल्यानंतर पुन्हा अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये इंद्रायणीनगरमधील भाजी विक्रेत्यांना प्राधान्य देऊन प्राप्त अर्जांमध्ये सोडत काढण्यात आलेली होती. त्यानुसार 90 गाळे वितरित झाले. ज्यांना गाळे मंजूर झाले आहेत. त्या सर्वांना कराव्यतिरिक्त निव्वळ भाडे 1 हजार 711 याप्रमाणे सहा महिन्यांचे भाडे 10 हजार 266 अनामत रक्कम भरून भाडेकरारनामा करून देण्यास कळविण्यात आले.

त्यात 54 लोकांनी रक्कम भरलेली आहे. परंतु भाडेकरारनामा करुन दिलेला नाही. ज्या भाजी फळ विक्रेत्यांना गाळे मंजूर झालेले आहेत. ज्यांनी रक्कम भरलेली आहे. त्यांनी भाडेकरारनामा करुन द्यावा. ज्यांनी अनामत रक्कम भरली नाही. त्यांनी रक्कम भरुन 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत भाडेकरारनामा करून घ्यावा. त्यांनतर कोणत्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नसल्याचे आयुक्त पाटील यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.