Nashik News : नाशिक येथे होणार अखिल भारतीय विद्युत मजदूर संघाचे सतरावे त्रिवार्षिक अधिवेशन

एमपीसी न्यूज – भारतीय मजदूर संघ ह्या देशातील क्रमांक एकच्या केंद्रीय कामगार संघटनेला संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्युत कामगार महासंघाच्या सुवर्ण जयंती वर्षातील 17वे त्रिवार्षिक अधिवेशन 14 व 15 मे रोजी नाशिक येथील पुणे विद्यार्थी वसतिगृह संचलित देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.

20 राज्यातील 500 महासंघाचे पदाधिकारी प्रतिनिधी ह्या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. कोविड प्रतिबंधासाठी शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचे पूर्णतः पालन करून हे अधिवेशन संपन्न होईल, अशी माहिती अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संघटनमंत्री विलास झोडगेकर यांनी अधिवेशन आढावा बैठकीत दिली.

या ऐतिहासिक अधिवेशनाचे उदघाटन अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष के के हरदास यांच्या हस्ते होईल. तर महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अनिल ढुमणे हे स्वागताध्यक्ष म्हणून देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचे व पाहुण्यांचे स्वागत करतील.

भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी सुरेंद्रन, राष्ट्रीय मंत्री रामनाथ गणेशे हे विशेष अतिथी व प्रमुख मार्गदर्शक आहेत. भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रिय संघटन मंत्री  सी. व्ही. राजेश, उद्योग प्रभारी अख्तर हुसेन आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि विद्युत निगम प्रभारी एल. पी. कटकवार यांची प्रमुख उपस्थिती असून ते मार्गदर्शन करणार आहेत.

दोन दिवसीय 17वे त्रिवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आर मुरलीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. अमर सिंह सांखला महामंत्री हे अधिवेशनाचे संचालन करतील.

विद्युत क्षेत्राला भेडसावणा-या समस्या, केंद्र व राज्य सरकारे घेत असलेले परस्परविरोधी निर्णय, कामगार व कामगार संघटना विरोधी पारित झालेले कायदे शासकीय विद्युत क्षेत्राचा होत असलेला संकोच, विद्युत क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्न आदी विषयांवर ह्या अधिवेशनात चर्चा होऊन आगामी रणनिती निश्चित्त केली जाईल. विद्युत क्षेत्रापुढे येणाऱ्या आव्हानांचा तितक्याच खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी संपूर्ण जबाबदरी युवा नेतृत्वाकडे सोपवली जाईल व महत्वपूर्ण प्रस्ताव पारित होतील.

सुवर्ण जयंती वर्षात संपन्न होणारे हे अधिवेशन घेण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे. या संधीचे सोने करण्याचा निर्धार कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव व महामंत्री अरुण पिवळ यांनी केला आहे. अधिवेशन संयोजनाची संपूर्ण जबाबदारी नाशिकच्या कार्यकर्त्यांवर सोपवली असून त्यानुसार नाशिकची टीम कामाला लागली असल्याचे अधिवेशन संयोजक व संघटन मंत्री विलास झोडगेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.