Bhosari News : मंडल अधिकारी महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी ; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मंडल अधिकारी महिलेने विरोधात निकाल दिल्याने तिला दमदाटी करत अधिकारी महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी (दि. 5) दुपारी मंडल अधिकारी कार्यालय, लांडेवाडी भोसरी येथे घडला. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकारी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी नगरसेवक काळूराम मारुती पवार, अशोक किसन बहिरवाडे (रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन), सागर बहिरवाडे (रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून ‘तू आमच्या विरोधात निकाल का दिला. तू इथे नोकरी कशी करते तेच मी बघतो’ अशी धमकी देत फिर्यादीकडील कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चिखली येथे बैलगाडा शर्यती असल्याने बैलगाडा शर्यतीच्या घाटाचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेतली आणि रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा आणला.

आरोपी काळूराम पवार याने फिर्यादी यांना ‘तुझ्यावर ॲट्रॉसिटीची केस करून तुला जेलमध्ये टाकतो’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.