Nigdi : समर्थ प्रॉडक्शन व मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे 8 व 9 फेब्रुवारीला ‘स्वर गंधर्व संगीत महोत्सव’

एमपीसी न्यूज – समर्थ प्रॉडक्शन आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 आणि 9 फेब्रुवारी 2020 असा दोन दिवसांचा ‘स्वर गंधर्व संगीत महोत्सव’ आयोजित केल्याची माहिती रमा राजीव पाटील, वा. ना. अभ्यंकर यांनी आज (दि. 13) पत्रकार परिषदेत दिली. स्वर गंधर्व संगीत महोत्सव सेक्टर 25, प्राधिकरण-निगडी, पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केला आहे. कार्यक्रम स्थळाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्यात येणार आहे. महोत्सवातील काही कार्यक्रमांना प्रवेशमूल्य आहे.

यावेळी मातृमंदिर संस्थेचे अध्यक्ष नितीन कारिआ, श्रीकृष्ण अभ्यंकर, माध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे, मानस ग्रुपचे संजय नरोडे, उद्योजिका निरुपमा कानिटकर, उद्योजक बाबूसेठ शेख, निगडी केंद्राचे उपप्रमुख मनोज देवळेकर, सुरेश कुलकर्णी, रवी सातपुते उपस्थित होते. सिद्धीविनायक ग्रुपचे राजू सांखला महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आहेत. काकडे कन्स्ट्रक्शनचे संजय काकडे यांचे महोत्सवाला विशेष सहकार्य लाभले आहे.

पंडित उल्हास कशाळकर, पंडित राकेश चौरसिया, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, उस्ताद अर्शद अली खान, शाकीर खान, सोनिया परचुरे, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे या कलाकारांच्या सहभागाने पिंपरी-चिंचवडकर रसिकांसाठी ‘स्वर गंधर्व संगीत महोत्सव’चे आयोजन केलेलं आहे. राष्ट्रीय विषयांवरील दिग्गजांच्या व्याख्यानांसह बालकलाकारांच्या गायन-वादनाचाही आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

मातृमंदिर संस्थेची स्थापनेपासूनच कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याची भूमिका आहे. महाराष्ट्रव्यापी समूहगान स्पर्धा, विविध रागांमधील श्लोक रचनांच्या स्पर्धा, ग्रीष्म पर्व संगीत सभा या आणि अशा अनेक माध्यमांतून संस्थेचा संगीतसाधनेच्या उत्कर्षासाठी गेली 28 वर्षे प्रयत्न सुरू आहे. समर्थ प्रॉडक्शन सुद्धा उपशास्त्रीय, भक्तीसंगीत, सुगमसंगीत अशा प्रकारचे कार्यक्रम अनेक वर्षे सातत्याने यशस्वीपणे आयोजित करत आहे. दोन्ही संस्थांतर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शास्त्रीय संगीताचा स्वर गंधर्व संगीत महोत्सव भरवण्यात येत आहे.

ज्याप्रमाणे पुण्यामध्ये गुणी, जाणकार श्रोत्यांसाठी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव होत असतो त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील जाणत्या रसिक श्रोत्यांसाठी व स्थानिक कलाकारांसाठी स्वर गंधर्व हे हक्काचे व्यासपीठ उदयास यावे, अशी ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका आहे. गिनीज बुकमध्ये नाव आलेल्या कोल्हापूर येथील संयोगीता पाटील यांच्या संस्थेतील ३०० कलाकारांचे नृत्य सादर होणार आहे.

सामवेद गायन व सरस्वतीपूजनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. 8) सुरुवात सकाळी 6.30 वाजता होणार असून 7.15 वाजता आदिती जोशी व श्रुती करंदीकर यांचा भक्ती प्रभात हा कार्यक्रम होणार आहे. 11 वाजता ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विषयावर सु. ग. शेवडे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्राची सुरुवात 3.30 वाजता डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पी. डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाने होईल. सामूहिक बासरीवादनानंतर (वेणुवृंद होट्टल) ऋचा पाटील गणेश वंदना सादर करणार आहे. अंजली गायकवाड (शास्त्रीय गायन), अनहद वारसी (बासरी) आणि सोहम गोराणे (तबला) यांची जुगलबंदी रंगणार आहे. त्यानंतर शाकीर खान यांचे सतार वादन होणार असून विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनाने पहिल्या दिवसाची रात्री 10 वाजता सांगता होणार आहे.

महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी (दि. 9) सकाळी 7.15 वाजता ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी व परिसरातील कलाकार भक्ती प्रभात हा कार्यक्रम सादर करणार असून सकाळी 10 वाजता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी 12 वाजता मातृमंदिर संस्थेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे.

महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचा उद्घाटन समारंभ दुपारी 3.30 वाजता आयोजित केला असून उद्घाटन जेएसपीएमचे अध्यक्ष आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर उस्ताद अर्शद अली खान यांचे गायन, सोनिया पुरचुरे यांचे शास्त्रीय नृत्य, पंडित राकेश चौरसिया यांचे बासरी वादन होणार असून महोत्सवाचा समारोप पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.