Nigdi crime News : खून करून पळून जाणाऱ्या आरोपीला कर्नाटकच्या सीमेवरून अटक

एमपीसी न्यूज – सहा वर्षांपूर्वी जाणीवपूर्वक अपघात करून भावाला मारल्याच्या संशयावरून एकाने दारूच्या नशेत एकाला चाकूने भोकसले. त्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजता ओटास्किम, निगडी येथे घडली. घटना घडल्यानंतर आरोपी कर्नाटक राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता. निगडी पोलिसांनी पाठलाग करून त्याला महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवरून अटक केली.

दौलत शरमुद्दीन बागवान (वय 40, रा. ओटास्किम, निगडी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रकाश तुकाराम शिंगे (वय 40, रा. ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मयत दौलत आणि त्यांचा मित्र राहुल नाटेकर (वय 26) हे दोघेजण ओटास्किम, निगडी येथे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी प्रकाश शिंगे दारू पिऊन तिथे आला. त्याने घरगुती वापराच्या चाकूने दौलत यांना भोकसले.

यात दौलत गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना दौलत यांच्या फिर्यादीवरून प्रकाश शिंगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यात दौलत यांच्या पोटात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी शिंगे पळून गेला. दौलत यांच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात कलमवाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. निगडी पोलिसांनी आरोपीचा बार्शी, टेंभुर्णी, सोलापूर, अक्कलकोट या भागात शोध घेतला. तपासादरम्यान पोलीस हवालदार नागेंद्र बनसोडे, पोलीस शिपाई होनमाने यांना माहिती मिळाली की, आरोपी कर्नाटक राज्यात पळून जाण्याच्या तयारीत आहे.

त्यानुसार पोलिसांनी थेट महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर सापळा लावून प्रशांत शिंगे याला ताब्यात घेतले.  शिंगे यांचा भाऊ मल्लेश तुकाराम शिंगे (वय 17) याला सन 2014 साली मयत दौलत यांचा भाऊ दस्तगीर शमशुद्दीन बागवान याने जाणीवपूर्वक अपघात करून मारले असल्याचा राग आरोपी प्रशांत याच्या मनात होता.

त्यातून त्याने हा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी प्रशांत याला बेड्या ठोकल्या. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडीचे प्रभारी अधिकारी दिलीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस उप निरीक्षक केरबा माकणे, प्रकाश लोखंडे, पोलीस हवालदार किशोर पढेर, नागेंद्र बनसोडे, पोलीस नाईक शंकर बांगर, विलास केकाण, पोलीस शिपाई तुषार गेंगजे, विनोद होनमाने, अमोल साळुंखे, राहुल मिसाळ, विजय बोडके, भुपेंद्र चौधरी, दिपक जाधवर, इरफान मोमीण, रोहीत मोरे, संदिप कांबळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.