Bhosari crime News: एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केला 16 लाख 75 हजारांचा गुटखा

एमपीसी न्यूज – गोडावूनमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा पोलिसांनी छापा मारून जप्त केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी सोळा लाख 75 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सोमवारी (दि. 23) बो-हाडेवस्ती येथे केली.

कार्तिक सुभाष दळवी (वय 22, सध्या रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी. मूळ रा. मोताळा, बुलढाणा), किरण कोठारी (रा. घरकुल, चिखली), गोपाल पाटील (रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दळवी यास पोलिसांनी अटक केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, पोलीस कर्मचारी स्वप्नील लांडगे यांना माहिती मिळाली की, आरोपींनी बोऱ्हाडेवस्ती, मोशी येथील एका गोडाऊनमध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा करून ठेवला आहे.

त्यानुसार पोलिसांनी छापा मारून आरोपी दळवी यास अटक केली. तसेच, गोडावूनमध्ये लपवून ठेवलेला गुटखा आणि टेम्पो असा अठरा लाख 75 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दळवी याचे दोन साथीदार कोठारी आणि पाटील फरार झाले आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.