Chinchwad : कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करणे पडले महागात; पोलिसांनी दिले अनोखे बक्षीस

एमपीसी न्यूज – कारच्या छतावर बसून स्टंटबाजी (Chinchwad) करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. तरुणांनी केलेल्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तरुणांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. तसेच दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांची कारही जप्त केली आहे. एवढ्यावर पोलीस थांबले नसून या कारवाईचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करत बक्षीस असे म्हटले आहे. यामुळे अशा स्टंटबाजांना आळा बसणार आहे.

प्रतिक सुशिल शिंगटे (वय 24, रा. कृष्णानगर, निगडी), ओमकार कृष्णा मुंढे (वय 20, रा. निगडी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक योगेश गायकवाड यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक शिंगटे हा चिकन आणि वडापाव सेंटर चालवितो. तर, ओमकार मुंढे हा निगडी पोलीस लाईनमध्ये राहत आहे. हे दोघेही गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेअकरा वाजता चिंचवड येथील केएसबी चौकामध्ये वेगाने कार चालवत स्टंटबाजी करत होते. शिंगटे हा कार चालवत होता. तर मुंढे हा कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करत होता.

त्यामुळे रस्त्यावरील इतरांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशी परस्थिती निर्माण झाली होती. या दोघांनी चालविलेल्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पोलिसांनी पाहिल्यानंतर पोलिसांनी तातडीने या दोन्ही तरुणांना शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांची कारही जप्त करण्यात आली आहे.

अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी म्हणाले, “रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूकीच्या सर्व नियमांचे पालन करायला हवे. दुचाकी, चारचाकी चालविताना स्टंटबाजी करणे चुकीचे आहे. यामुळे (Chinchwad) स्वत:सह दुसऱ्यांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कारमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढे रसत्यावर असा कोणताही स्टंट खपवून घेतला जाणार नाही.”

तरुणांच्या कामगिरीबाबत पोलिसांनी दिले बक्षीस

कारमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना अटक केल्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकाराची माहिती आपल्या एक्स अकाऊंटवर ट्विट केली आहे. स्टंटटबाजीचा व्हिडीओ आणि कारवाईनंतरचे फोटो सोशल मिडियावर टाकले आहेत. त्या फोटोखाली ‘बक्षीस’ असे कॅप्शन देखील पोलिसांनी लिहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.