Nigdi Crime News : नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावाचा वापर करून घरातील सामान संबंधित मालकाच्या घरी पोहोच न करता त्या बदल्यात खंडणी उकळणाऱ्याला आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडून 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

विरेंद्रकुमार रामकिशन पुनिया (वय 25, रा. सध्या ट्रान्सपोर्टनगर, निगडी, मुळगाव जि. चुरु, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला 14 डिसेंबर पर्यंत पोलीस रिमांड मध्ये घेण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, आरोपी विरेंद्रकुमार रामकिशन पुनिया याने व्हीआरएल या नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावाचा गैरवापर करून निगडी येथे ‘व्हीआरएल कार्गो इंडिया पॅकर्स’ हि बनावट कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून राजेश नायक यांचे घर सामान पुण्यातून मँगलोर येथे शिफ्ट करायचे होते. त्यासाठी 11 हजार रुपये भाडे ठरले होते.

आरोपीने भाड्याच्या ठरलेल्या रकमेतील आठ हजार घेऊन देखील घर सामान स्वत:कडे ठेवले, तसेच सामान हवे असल्यास 9 हजार रुपये खंडणी स्वरुपात वसूल केली.

फसवणूक झाल्याने राजेश नायक यांच्यावतीने त्यांचे मित्र आशिष गावडे यांनी कर्वेनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा निगडी परिसरातील असल्याने निगडी पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात निगडीत अशी कोणतीही कंपनी नसल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हयातील आरोपीने VRL CARGO या नामांकीत कंपनीच्या नावाचा गैरवापर करुन अनेक लोकांची फसवणुक करुन खंडणी उकळली असल्याचे तपासात समोर आले. खंडणी विरोधी पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

निगडीच्या गोडाऊन मध्ये ठेवलेले घर सामान, मोफेड, एक मोबाईल असे एकूण 1 लाख 60 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.