Nigdi Crime News : अपहरण केलेल्या ‘त्या’ तरुणाचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज – घरात झोपलेल्या तरुणाचे शुक्रवारी (दि. 11) मध्यरात्री आठ ते दहा जणांच्या टोळक्याने अपहरण केले होते. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाला आहे. आज (रविवारी दि.13) दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे.

सचिन उर्फ अंड्या लक्ष्मण चौधरी (वय 22, रा. रुपीनगर, तळवडे मूळगाव राजस्थान) असे अपहरण करून खून केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील लक्ष्मण हुकमाराम चौधरी (वय 47) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी योगेश दिनेश सावंत (वय 22, रा. रुपीनगर), आकाश उर्फ गुंड्या प्रकाश भालेराव (रा. चिंचेचा मळा, टॉवर लाईन रोड, तळवडे), रुपेश प्रकाश आखाडे (वय 23, रा. शिवरकर चौक, त्रिवेणीनगर) आणि अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन चौधरी याचे शुक्रवारी मध्यरात्री अपहरण केले. त्यानंतर सचिन दिवसभर घरी आला नाही, त्यामुळे त्याच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अपहरण केलेल्या सचिनचा खून करून मृतदेह बेबड ओव्हळ येथील जुन्या पुलावरून नदीपात्रात टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी (दि.12) शोधमोहीम राबविली. मृतदेह नदीतून वाहत जात एका ठिकाणी अडकून पडलेला मिळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत तरुण हे सर्वजण पूर्वी एकत्र होते. त्यांनी एकत्रितरित्या गुन्हेही केले आहेत. पैसे वाटण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.