Nigdi News : मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे पुरस्कार जाहीर; बुधवारी वितरण

एमपीसी न्यूज – निगडीतील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

भारती ठाकूर यांना ‘वा. ना. अभ्यंकर गुरूगौरव पुरस्कार’, योगेश कुलकर्णी ‘समाजशिक्षक’, महेंद्र सेठिया ‘कार्यकर्ता गुणगौरव’, द्वारका वालगुडे यांना ‘राधामाता’ आणि ओंकार बाणाईत यांना ‘अध्यापकोत्तम’ पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन कारिया, कार्यवाह यशवंत लिमये, कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

निगडी, प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील मनोहर सभागृहात बुधवारी (दि.4) हा कार्यक्रम होणार आहे. ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे कार्यवाह सुभाषराव देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. गुरुपौर्णिमा हा मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा वर्धापनदिन असतो. या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात समर्पणपूर्वक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव केला जातो. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

गेली अनेक वर्षे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि नर्मदा संस्थेमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम, औपचारिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याचे उल्लेखनीय काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील भारतीताई ठाकूर यांना ‘वा. ना. अभ्यंकर गुरूगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

सुमारे 30 वर्षे विज्ञान आश्रम पाबळच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे समयोचित विकसत करून ग्रामीण प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचे उल्लेखनीय कार्य करणारे योगेश कुलकर्णी यांना ‘समाजशिक्षक’ पुरस्कार देण्यात येणार आहे. तंत्रशिक्षणाला पूरक अभ्यासक्रमाची निर्मिती, त्याचे अनेक शाळांमधून उपयोजन, ग्रामीण युवकांमधून उद्योजक घडविण्याचे कार्य कुलकर्णी करत आहेत.

ज्ञान प्रबोधिनी संस्थेमध्ये 35 वर्षांपासून पूर्ण वेळ कार्यकर्ता असलेले, विविध व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व विकसन शिबिराचे संयोजक, ज्ञान प्रबोधिनीच्या औपचारिक, अनौपचारिक आणि तत्सम शैक्षणिक कार्यक्रम महाराष्ट्राभर पोहचविणारे महेंद्र सेठिया यांना ‘कार्यकर्ता गुणगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दारूबंदी, ग्रामीण युवा संघटना, युवक विभागाचे प्रमुख, छात्र प्रबोधन मासिकाचे संपादक, विभागप्रमुख, वृत्तपत्रासाठी लेखन, विविध पुस्तकांचे लेखन सेठिया यांनी केले आहे. देशभरात ज्ञान प्रबोधिनीच्या कार्याचा विस्तार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

ज्ञान प्रबोधिनी आणि भारत फोर्जच्या सहकार्याने प्रज्ञा विकासचे पुण्यातील वस्ती भागात, रायगड आणि गोवा – फोंडा येथे काम आहे. अनुभव शाळा हा नव्याने सुरु केलेला उपक्रम – पुण्यातील तीन वस्ती भागात सुरु आहे.

पुण्यातील वस्त्यांत गेली सात वर्षे काम करणारे ओंकार बाणाईत यांना ‘अध्यापकोत्तम’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.