Nigdi : गाडी बाजूला घेण्यास सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – रस्त्यात गाडी पार्क केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यावरून दोघांनी मिळून पोलिसांशी हुज्जत घालून पोलिसांना मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (दि. 26) दुपारी त्रिवेणीनगर चौक तळवडे येथे घडला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

दीपक शंकर यादव (वय 39, रा. त्रिवेणीनगर, तळवडे), सतीश सोपान खराडे (वय 32, रा. मोशी प्राधिकरण, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार रामहरी गेनबा तनपुरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार तनपुरे निगडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते त्यांचे सहकारी पोलीस शिपाई दहिफळे यांच्यासोबत तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची एक कार (एम एच 14 / एच जी 8462) भर रस्त्यात थांबवली. रस्त्यात गाडी थांबवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे तनपुरे यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून आरोपींनी ‘गाडी बाजूला घेणार नाही’ असे बोलून तनपुरे यांना शिवीगाळ केली. आरोपींसोबत तनपुरे यांचा वाद सुरु झाल्याने हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या पोलीस शिपाई आवटे यांना देखील आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. याबाबत पोलीस हवालदार तनपुरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.