Nigdi : राज्यस्तरीय गझललेखन स्पर्धेत प्रीती जामगडे प्रथम

एमपीसी न्यूज – “निष्ठेने शब्दांची साधना केल्यास गझल वश होते!” असे मत ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख यांनी निगडी येथे व्यक्त केले. साहित्य सुधा आणि गझलपुष्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गझललेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ए.के.शेख बोलत होते.

राज्यस्तरीय गझललेखन स्पर्धेत चंद्रपूर येथील प्रीती जामगडे यांनी प्रथम, पुण्यातील स्वाती यादव यांनी द्वितीय आणि धामणगाव (रेल्वे) येथील नारायण सुरंदसे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रघुनाथ पाटील यांनी परीक्षण केले. विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.

गझलकार ए.के.शेख पुढे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरातील गझलकार एकत्र येऊन उत्तम गझल मुशायऱ्याचे आयोजन करतात, हे पाहून मन आनंदाने भरून आले. प्रतिभावंत साहित्यिक जर एकोप्याने राहू लागले तर त्यातून समाजाला खूप चांगला संदेश मिळेल; आणि देशाच्या उन्नतीसाठी देखील ही पूरक गोष्ट आहे”

ज्येष्ठ कवी बी.एस.बनसोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बनसोडे यांनी आपल्या मनोगतातून, “मराठी भाषा ही समृद्ध असल्याने कवींनी प्रत्येक शब्दसंवेदन जाणून घेत त्याचा चपखल वापर करायला शिकले पाहिजे. सातत्याने लेखन करीत राहिल्यास लेखनातील तंत्र आणि मंत्र अवगत होते!”

यावेळी झालेल्या गझल मुशायऱ्यात सुमारे वीस कवींनी आपल्या विविध विषयांवरील खुमासदार गझला सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. सहभागी गझलकारांना झाडाचे रोप आणि ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नंदीन सरीन यांनी स्वागतगीत म्हटले.

राजेश जैन, दादा इंचलकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे आणि दिनेश भोसले यांनी मुशायऱ्याचे सूत्रसंचालन केले. भाग्यश्री कुलकर्णी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.