Nigdi : पुलांवर वाढणा-या झाडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – पुलांवर वाढणारी झाडे पूल आणि रस्ता दोन्हीसाठी धोक्याची आहेत. पुलांवर वाढणारी झाडे वेळीच काढली नाहीत तर त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता वाढते. निगडी मधील पवळे उड्डाणपुलावर अशाच प्रकारचे एक पिंपळाचे झाड वाढत आहे. ऐन पुलावर झाड असल्याने हे झाड मोठे झाल्यास पुलाच्या सुरक्षेला इजा पोहोचण्याची शक्यता आहे. याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

घरांच्या छपरांवर, भिंतींवर वाढलेली झाडे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. सुरुवातीला पाहायला चांगली वाटणारी हीच झाडे पुढे जाऊन धोक्याची बनतात. झाड जितक्या प्रमाणात वर वाढते. तेवढीच त्याची मुळे खोलवर रुजली जातात. भिंतीवर किंवा रस्त्यावर कुठेही आलेले झाड वाढताना त्याच्या मुळांचा देखील विस्तार होतो. भिंतींवर वाढणा-या झाडांमुळे कालांतराने भिंतीला तडे जाणे, स्लॅब चिरणे, काही वेळेला भिंत कोसळण्याचे देखील प्रकार घडले आहेत. त्यामुळे लहान असताना छान दिसत आहेत, म्हणून राखलेली झाडे पुढे धोकादायक बनतात.

भिंतींवर, छपरांवर, रस्त्यावर अनावश्यक ठिकाणी अशा प्रकारची झाडे उगवली असतील, तर त्यांचे वेळीच पुनर्रोपण व्हायला हवे. ही झाडे लहान असताना खूप सुंदर दिसतात. पण त्यांची वाढ झाल्यास त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण होतो. निगडी मधील पवळे उड्डाणपुलावर एक पिंपळाचे झाड वाढत आहे. रस्त्याच्या मधोमध हे झाड वाढत असल्याचे सध्या याचा कसलाही त्रास नाही. मात्र हे झाड जसजसे मोठे होईल, तसतसे त्याची मुळेही पूलमध्ये रुजत जातील. कालांतराने पुलाला तडे जाण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच काळजी घेऊन अशा झाडांचे पुनर्रोपण करायला हवे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.