Pune News : पुणेकरांसाठी खुशखबर! पुढील आर्थिक वर्षात करवाढ नाही

एमपीसी न्यूज – मिळकत कर आणि करमणूक करात पुढील आर्थिक वर्षात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले मिळकत कर आणि करमणूक करांचे दर पुढील आर्थिक वर्षात ही कायम ठेवणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, उपलब्ध आर्थिक स्त्रोतांचा विचार करून अत्यावश्यक खर्च, प्रकल्पीय किंवा भांडवली खर्च यांचे आगामी वर्षासाठी नियोजन करावे लागते. त्यानुसार कराचे दर निश्चित करावे लागतात. महापालिका अधिनियमानुसार या दरांना दरवर्षी 20 फेब्रुवारी पूर्वी मुख्य सभेची मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार आज करांचे दर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रासने पुढे म्हणाले, 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत मिळकतीचा पूर्ण कर भरणाऱ्या मिळकतकरांना देण्यात येणाऱ्या पाच किंवा दहा टक्के सवलती, गांडूळ खत प्रकल्प, सौरउर्जा प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग या योजना राबविण्याऱ्या मिळकतकर धारकांना देण्यात येणाऱ्या सवलती पुढील आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नी किंवा माता, राष्ट्रपती पदक विजेते, माजी सैनिक, सैनिकांच्या पत्नी किंवा वीरपत्नींना राज्य शासनाच्या नियमांनुसार विविध प्रकारच्या करसवलती देण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेतील सध्याच्या मिळकती आणि नव्याने समाविष्ट गावांतील मिळकतीतून पुढील वर्षी दोन हजार 332 कोटी रुपयांचा अपेक्षित अंदाज करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.