Nobel laureate becomes Graduate: नोबेल विजेती मलाला युसुफझाई झाली ऑक्सफोर्डमधून ‘ग्रॅज्युएट’

Nobel laureate becomes Graduate - Nobel laureate Malala Yousafzai graduates from Oxford

एमपीसी न्यूज – नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई ‘ऑक्सफोर्ड’ मधून पदवीधर झाली आहे. तिने ब्रिटनमधील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळविली आहे.

मलालाने पदवी मिळाल्याचा आनंद विद्यापीठात आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत साजरा केला. याची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर करत दिली आहे. मलालाने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने आपल्या कुटुंबासमवेत एक मोठा कार्यक्रम साजरा केला आणि आपल्या भविष्यात काय करायचे आहे, यासंदर्भात खुलासा केला आहे. दुसऱ्या एका फोटोत पदवीनंतर विद्यापीठात केलेल्या जल्लोष दिसून येतोय.

_MPC_DIR_MPU_II

या ट्विटमध्ये आपल्या भावनांना वाट करुन देताना मलाला म्हणाली,  ‘मी ऑक्सफोर्डमधून मी तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली. याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. पुढे काय आहे हे मला माहिती नाही. आत्तासाठी नेटफ्लिक्स, वाचन आणि झोप हा नित्यक्रम राहणार आहे.’

स्त्रीशिक्षणाबद्दल असलेला पराकोटीचा विरोध झुगारुन देऊन मलालाने हे यश मिळवले आहे. या तिच्या जिद्दीला सगळ्या जगातून सलाम करण्यात येत आहे. तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. ह्या बंदीविरुद्ध मलालाने लढा चालवला होता. तसेच ह्या भागात महिलांच्या मानवी हक्कांच्या चाललेली पायमल्ली देखील तिने जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.

9 ऑक्टोबर 2012 रोजी शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर तीन गोळ्या झाडल्या. ह्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मलालाला उपचारांसाठी इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये हलवण्यात आले. मलालावरील ह्या हल्ल्याची जगभर तीव्र नोंद घेतली गेली व अनेक देशांनी ह्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. ह्या जीवघेण्या हल्ल्यामधून बचावलेल्या मलालाने स्त्री शिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचे जाहीर केले.

10 ऑक्टोबर 2014 रोजी मलालाला नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. हे पारितोषिक तिला भारताच्या कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत विभागून दिले गेले. वयाच्या 17व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती आहे. पाकिस्तानात दहशतवादी संघटनांना तिने तीव्र विरोध केला. पाकिस्तानातल्या परिस्थितीचं भीषण चित्रण करण्यासाठी तिने एका वर्तमानपत्रात ‘गुलमकई’ या नावाने डायरी लिहिली आहे. ‘एक पुस्तक,एक लेखणी ,एक बालक आणि एक शिक्षक अवघे जग बदलू शकते’, हा विचार तिने मांडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.