Pimpri: शिक्षकांसाठी आता ऑनलाइन ‘क्लासरुम’!

Now online classroom for teachers.

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गजन्य घटनेमुळे शाळा प्रत्यक्ष सुरू कधी होतील याबाबत अनिश्चितता आहे. परंतु शिक्षण प्रक्रिया प्रभावाने सुरू राहावी, या दृष्टीने राज्यातील शिक्षकांसाठी आता ऑनलाइन क्लासरुम सुरू होणार आहेत.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गजन्य घटनेमुळे टाळेबंदी, संचारबंदी लागू आहे. यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहे.

शिक्षण प्रक्रिया सुरू असली तरी विद्यार्थी शिक्षक प्रत्यक्ष संवाद होत नाही. ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया अधिक गतीने सुरू व्हावी आणि विद्यार्थी सहभाग वाढावा यासाठी आता शिक्षकांना राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील शिक्षकांसाठी गुगल क्लासरुम ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शाळा, विद्यार्थी, ऑनलाइन अध्यापन, गृहपाठ आणि सूचनांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.

राज्यातील शिक्षकांसाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळपास 45 हजार शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पुढील टप्प्यात राज्यातील खाजगी अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी शिक्षक तंत्रस्नेही असावा, इंटरनेट, दोन मोबाईल, संगणकासह लॅपटॉप असणे आवश्यक आहे.

राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांना ऑनलाइन सहभागासाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नोंदणी करताना शिक्षकाची संपूर्ण माहिती, मेल आयडी यासह इतर माहिती भरावी लागणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत राज्यातील शिक्षण प्रक्रिया अधिक गतीने सुरू व्हावी यासाठी शिक्षकांचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे संचालक दिनकर पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.