Disha : पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या पुढाकाराने झोपडपट्टी भागातील बालकांना मिळणार ‘दिशा’

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस मुख्यालय, निगडी येथे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘दिशा’ (Disha) या उपक्रमाअंतर्गत सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये वस्ती/ झोपडपट्टी भागामध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला/ गृहिणी समिती, बालकल्याण सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते/ प्रतिनिधी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज शुक्रवार (दि. 11 नोव्हेंबर) रोजी आयोजित करण्यात आली होती.

शिंदे यांनी उपस्थित सर्व महिला/ गृहिणी समिती, सामाजिक कार्यकर्ते/ प्रतिनिधी यांना बालक हे देशाचे भविष्य असून जागतिक पातळीवर भारताला तरुणांचा देश म्हणून ओळख प्राप्त आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलय अंतर्गत पोलीस ठाणे स्तरावर दाखल होणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन बालकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

यामध्ये प्रामुख्याने मिश्रवस्ती/ झोपडपट्टी भागांमधील बालकांचे गुन्ह्यांकडे वळण्याचे प्रमाण अधिक असून अशा बालकांची सामाजिक पार्श्वभूमी पाहता व्यसनाधीनता व अशिक्षितपणा या कारणांमुळे ही बालके नकळत गुन्हेगारी मार्गावर गेल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने अशा दिशा (Disha) भरकटलेल्या बालकांच्या उज्वल भविष्यासाठी दिशा उपक्रम पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष बालपथक, गुन्हे शाखेच्या मार्फत राबविण्यात येत आहे.

शहरात सद्यस्थितीत 75 झोपडपट्ट्या अस्तित्वात आहेत. या उपक्रमांतर्गत सर्वच वस्ती/ झोपडपट्टी भागामध्ये महिला/ गृहणी समिती व क्रीडा समन्वयक, शिक्षण समन्वयक आणि व्यसनमुक्ती समन्वयक असे एकूण 400 हून अधिक महिला व समन्वयकांची पोलीस ठाणे स्तरावर विना मोबदला नेमणूक करण्यात आलेली आहे.

या महिला/ गृहिणी समिती व समन्वयकांच्या माध्यमातून व्यसनाच्या आहारी गेलेले बालक तसेच शाळाबाह्य बालकांना गुन्हेगारी मार्गावर जाण्यापासून परावृत्त करून त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व महिला/ गृहिणी समिती, सामाजिक कार्यकर्ते/ प्रतिनिधी यांना समाजासाठी आपण देत असलेले योगदान खरंच कौतुकास पात्र असून यामुळे नक्कीच या बालकांना योग्य दिशा मिळणार असल्याचे सांगून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

पिंपरी चिंचवडचे (Disha) अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी ‘दिशा’ या उपक्रमाचे प्रास्ताविक सादर करून संपूर्ण उपक्रमाची थोडक्यात माहिती करून दिली. तसेच, विशेष बालपथकाचे नोडल अधिकारी डॉ. सागर कवडे व त्यांच्या संपूर्ण टीमने निगडी ओटा स्कीम येथे राबविलेल्या क्रीडा उपक्रमामुळे दिशा भरकटलेल्या बालकांना नवी दिशा मिळत असल्याचे सांगून असे क्रीडा उपक्रम सर्व महिला समिती, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने एकत्र येऊन असे क्रीडा उपक्रम राबविल्यास अशा बालकांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून मोलाचे काम आपल्याकडून घडणार असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी सर्व उपस्थितांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Pradeep Tapkir : प्रदिप तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रंगणार ‘न्यू होम मिनिस्टर’; दुचाकीसह विविध बक्षीसे

महिला व बाल विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘लाईट हाऊस’ या उपक्रमाची माहिती करून दिली. तसेच, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दिशा उपक्रमाचे कौतुक करून महानगरपालिकेच्या वतीने या उपक्रमासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य केले जाईल असे बोलून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बालपथक, गुन्हे शाखेचे संपत निकम (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक) मपोना/ दिपाली शिर्के, पोशि अमोल मुठे, पोशि कपिलेश इगवे, पोशि भूषण लोहरे यांनी केले. तसेच, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विवेक पाटील पोलीस, उप आयुक्त, परिमंडळ 1 यांनी केले.

या कार्यक्रमास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) सतीश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाकड विभाग) श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक विशेष बालपथक (गुन्हे शाखा) देवेंद्र चव्हाण तसेच सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व समन्वयक पोलीस अधिकारी यांच्यासह महिला/ गृहिणी समिती, सामाजिक कार्यकर्ते/ प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.