Chikhali : बँकेची एक कोटी 69 लाखांची फसवणूक प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – बँकेकडून एक कोटी 78 लाख रुपयांचे व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले. काही दिवसानंतर बँकेचे हप्ते थकवून ठेवले. बँकेला एक कोटी 69 लाख 34 हजार 148 रुपये देणे बाकी असताना आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करून वाहनांवर कोणताही बोजा नसल्याचे दाखवून वाहनांची बँकेच्या परस्पर विक्री केली. याबाबत एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

संजय नारायण पवार (वय 49, रा. राजेशिवाजीनगर, चिखली प्राधिकरण) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत महेंद्रसिंग भावसिंग जगताप (वय 48, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार याने नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण को ऑप बँक शाखा चिंचवड येथून व्यावसायिक वाहन खरेदीसाठी एका खात्यावर 70 लाख आणि दुस-या खात्यावर एक कोटी आठ लाख रुपये कर्ज घेतले. त्यातून त्याने पाच व्यावसायिक वाहने खरेदी केली. पवार याने कर्जाचे हप्ते थकवले.

पुणे आरटीओ आणि पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये वाहनांवरील बोजा उतरविल्याचे दाखवण्यासाठी बँकेचा खोटा शिक्का तयार केला. त्याद्वारे आरटीओच्या फॉर्मवर शिक्का मारून सही केली. बँकेचे खोटे नाहरकत प्रमाणपत्र तयार करून त्यावर बँकेचा खोटाच शिक्का मारून सह्या केल्या. याद्वारे पवार याने बँकेची कर्जाची एकूण एक कोटी 69 लाख 34 हजार 148 रुपये रक्कम भरणे बाकी असताना पाच वाहनांची बँकेच्या परस्पर विक्री केली. याबाबत बँकेची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पवार याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.