Pimpri : गझलपुष्प संस्थेतर्फे येत्या रविवारी एक दिवसीय मराठी गझल संमेलन

एमपीसी न्यूज – गझलपुष्प या संस्थेने प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवारी (दि २४) एक दिवसीय मराठी गझल संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रतिभा महाविद्यालय, जुना मुंबई-पुणे महामार्ग, काळभोरनगर, चिंचवड येथे सकाळी ११:३० ते सायंकाळी ०७:०० या कालावधीत संपन्न होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख
भूषविणार असून उद्योजक अभय पोकर्णा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

विलास शिंदे आणि सुरेश लुणावत, प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया आणि दर्शन कापडिया यांच्या विशेष उपस्थितीत कल्याण येथील गझलकार प्रशांत वैद्य यांना पहिल्या गझलपुष्प पुरस्कार २०१९ ने सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक गझलकार सुहास घुमरे, महेश खुडे, नीलेश शेंबेकर, मीना शिंदे, समृद्धी सुर्वे, सारिका माकोडे, प्रदीप
गांधलीकर, राज अहेरराव गझल मुशायरा सादर करतील. नंदकुमार मुरडे या मुशायऱ्याचे निवेदन करणार आहेत.

संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ‘गझल कालची आणि आजची’ या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे, सुनंदा पाटील (गझलनंदा), प्रमोद खराडे आणि डॉ. कैलास गायकवाड सहभागी होणार असून प्रा. तुकाराम पाटील या चर्चासत्राचे समन्वयक आहेत. याप्रसंगी गारगोटी (कोल्हापूर) येथील गझलकारा स्नेहल कुलकर्णी यांच्या ‘स्नेहांकित’ या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

संमेलनाचा समारोप राज्यस्तरीय गझलकारांचा सहभाग असलेल्या मुशायऱ्याने होईल. त्यामध्ये डॉ. शिवाजी काळे (कर्जत), शेखर गिरी (कळंब), विश्वास कुलकर्णी, स्नेहल कुलकर्णी यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील प्रशांत पोरे, संदीप जाधव, अभिजित काळे, रघुनाथ पाटील, तुकाराम पाटील या गझलकारांचा सहभाग असून दिनेश भोसले या अंतिम मुशायऱ्याचे निवेदन करतील. विनाशुल्क असलेल्या या संमेलनाचा रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन गझलपुष्प या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.