Pimpri : आषाढातल्या शेवटच्या रविवारी पुणेकरांनी केले एक हजार टन मासे, चिकन आणि मटण फस्त

एमपीसी न्यूज – येत्या रविवारी (दि. 12) श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नसल्याने आषाढ महिन्यात आषाढ पार्ट्या केल्या जातात. त्यात रविवारी आखाड पार्ट्यांना विशेष गर्दी असते. काल (दि. 5) आषाढ महिन्यातला शेवटचा रविवार होता. त्यामुळे कालच्या दिवसाला सामिष खवय्यांकडून मांसाहाराला जास्त पसंती देण्यात आली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह परिसरात एकूण एक हजार टन मासे, चिकन आणि मटणाची विक्री झाली. इतर रविवारच्या तुलनेत हा विक्रीचा आकडा दुप्पट होता.

रविवारी अगदी सकाळपासूनच मासळी बाजारात सामिष खवय्यांनी गर्दी केली. शेवटचा रविवार असल्याने चिकन, मटण आणि माशांचे दर सुद्धा काही प्रमाणात वाढलेले दिसून आले. आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार आणि मैत्री दिवस यांचा मेळ जुळून आल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले होते. चिकन मटणावर ताव मारून मैत्री दिवस साजरा करण्याचा अनोखा योग अनेक तरुणांनी साधला. घरगुती मागणीसह हॉटेल व्यावसायिकांनी देखील विक्रमी खरेदी केली.

मासळी विक्रेते अख्तर शेख म्हणाले, मागील दोन वर्षात कोंबडी, बोकड आणि मासळी उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम भाववाढीत होत आहे. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी एक आठवडा आधीच चिकन व मटनाला मागणी वाढते. नेहमीपेक्षा दुप्पट कोंबड्या व बोकडांची जमवाजमव केली होती. यंदा गावरान कोंबड्या कमी असल्याने ब्रॉयलर चिकनला मागणी जास्त होती. पाटर्य़ांमुळे कोंबड्यांच्या विक्रीमध्ये चांगलीच वाढ झालेली दिसून आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.