Kamshet : महामार्गालगतचे अतिक्रमण हटविण्याच्या तहसीलदारांच्या आदेशाला आयआरबीकडून वाटण्याच्या अक्षता?

लोकांच्या जिवाशी खेळणारे अतिक्रमण ताबडतोब न हटविल्यास तीव्र आंदोलन - प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – पुणे मुंबई महामार्गालगत कामशेतजवळ अहिरवडे फाट्याजवळ मुंबई कॉरिडॉरमध्ये खासगी जागेवर झालेले अतिक्रमण काढण्याबाबत तहसीलदारांनी दिलेले आदेश म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (आयआरबी) ने धाब्यावर बसविल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी केला आहे. लोकांच्या जिवाशी खेळणारे हे अतिक्रमण ताबडतोब हटविले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक.४ कि. मी.४३७०० अहिरवडे फाटा येथे महामार्गालगतच्या गुरमित सोहनसिंग गील यांच्या मालकीच्या खासगी जागेवर अतिक्रमण झाले असून त्यामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहे. याबाबत गील यांनी 18 एप्रिलला तहसीलदार रणजित देसाई तसेच नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांना निवेदन दिले होते. नायब तहसिलदार सुनंदा भोसले पाटील गेल्या अनेक दिवसापासून फोनवरून आयआरबी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते फोन उचलत नाहीत. आयआरबीचे मुजोर अधिकाऱ्यांचा हा बेजबाबदारपणा म्हणजे महामार्गावरील वाहनचालक व प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे, असा आरोप नाईक यांनी केला आहे.

मी गेल्या तीन महिन्यापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. तरीही आय.आर.बी ला जाग का येत नाही, आय.आर.बी अधिकाऱ्यांना कोणत्या राजकीय नेत्याचा पाठिंबा आहे का, मोठ्या प्रमाणावर टोल आकारूनही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे का, रस्त्यावर अतिक्रमण असूनही आय.आर.बी का बघ्याची भूमिका घेत आहे, तसेच वडगांव फाट्यावर होणाऱ्या ट्राफिक बद्दल ही मी वारंवार आय.आर.बीशी वारंवार संपर्क साधला असता ते ही कोणतीच कारवाई का करत नाही, आय.आर.बी मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.