Pune : अन् ४३ वर्षांनी पुन्हा भरला इयत्ता ७ वीचा वर्ग

विद्या निकेतन माजी विद्यार्थी संघातर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन; मेळाव्यात १९७३-७४ ते ७६-७७ सालातील विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – शाळेची पहिली घंटा वाजल्यानंतर वर्गात विद्यार्थी जमले. परिपाठ सुरू झाला, सर्व विद्यार्थ्यांनी मिळून प्रार्थना देखील म्हटली. परंतु आज हे सर्व विद्यार्थी वेगळे दिसत होते. कोणी जाड झाले होते, तर कोणाच्या डोक्यावरचे केस गेलेले पाहून सर्व मित्र त्याला हसत होते. तर माझ्या शेजारी बसणारी मैत्रिण आता किती वेगळी दिसते हे पाहून तिचा मित्र आश्चर्य करीत होता. हे चित्र पाहायला मिळाले शुक्रवार पेठेतील विद्या निकेतन प्रशालेत तब्बल ४३ वर्षांनंतर पुन्हा त्याच शाळेत इयत्ता ७ वीचा माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरला होता.

शुक्रवार पेठेतील विद्या निकेतन प्रशालेच्या विद्या निकेतन माजी विद्यार्थी संघातर्फे प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शाळेचे ८९ वर्षांचे माजी मुख्याध्यापक सदाशिव गायकवाड, शाळेतील ज्येष्ठ माजी शिक्षक संपतराव भोसले (वय ८७ वर्षे), रुक्मिणी पैठणकर (वय ९१ वर्षे), वसंतराव काळे (वय ८४ वर्षे),रमेश जगताप (वय ८१ वर्षे), संगीता सिध्देश्वर (वय ७३ वर्षे), कांचन मोरे-माने (वय ७० वर्षे) यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी संघाचे नितीन पंडित, अशोक राऊत, बिरू खोमणे, हेमंत काजळे, दिपक दरेकर, शोभा पवार, विलास गंगावणे, माधुरी कुलकर्णी यांनी केले.

सदाशिव गायकवाड म्हणाले, अनेक वर्षांनंतर देखील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आठवण ठेवून त्यांचा सन्मान केला आहे ही आजच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या वर्गातील विद्यार्थी आज एका उच्च पदावर असून ते चांगले नागरिक देखील आहेत हे पाहून खूप अभिमान वाटत आहे, असे ही त्यांनी सांगितले.

वसंतराव काळे म्हणाले, अनेक वर्षांनी विद्यार्थ्यांना पाहिल्यावर त्यांचे लहानपणीचे चेहरे आठवले. या विद्यार्थ्यांनी घडविताना जो आनंद आम्हाला मिळत होता. तोच आनंद आजच्या काळातील शिक्षकांना होतो का असा प्रश्न पडतो. विद्यार्थी घडविणे म्हणजे समाज घडविणे आहे. त्यामुळे योग्य शिक्षण देणे ही शिक्षकांची महत्वाची जबाबदारी आहे, असे ही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.