Pimpri news: ‘कचरा वेचकां’चा पीएफ व मासिक वेतन फरकाची रक्कम तात्काळ अदा करा

सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जानेवारी-2011 ते मार्च-2015 कालावधीमध्ये घरोघरचा कचरा गोळा करणे, वाहतूक करणे या कामासाठी कार्यरत असणाऱ्या कामगारांना अद्यापही पीएफ व मासिक वेतनाच्या फरकेची रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे ती रक्कम संबंधित कामगारांच्या बँक खात्यावर तात्काळ अदा करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अ क्षेत्रिय कार्यालय, आरोग्य विभागामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे, वाहतूक करणे कामकाजासाठी जानेवारी-2011 ते मार्च-2015 मध्ये श्री. संत गाडगे बाबा महाराज स्वयंरोजगार संस्था व मे. रमाबाई स्वयंरोजगार सेवा सह संस्था मर्या. हे ठेकेदार म्हणून कामकाज करीत होते.

सदर संस्थेच्या कामगारांचा पीएफची रक्कम देणे बाकी असल्याने त्याची उर्वरित पीएफची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करणे कामी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या संबंधीचे पत्र सहा आरोग्याधिकारी अ क्षेत्रिय कार्यालय यांच्याकडून दि. 06/03/2020 रोजी आरोग्य निरीक्षक, कचरा वाहतुक विभाग, अ क्षेत्रिय कार्यालय यांस देण्यात आलेले आहे.

तसेच सदर पत्रासोबत कचरा गोळा करणार्‍या कामगारांची यादीही देण्यात आली आहे. परंतु यात कचरा वाहतूक करणारे वाहनचालक व सुपरवायजर यांच्या नावाची यादी न दिल्याने ते या निधीपासून वंचित राहू शकतात.

तसेच त्यांना त्या कालावधीमध्ये देण्यात येणार्‍या मासिक वेतनाचा फरकही देण्यात आलेला नाही. यामुळे माहितीच्या अधिकारात मिळवलेली सुपरवायझर व वाहन चालकांच्या नावांची यादी ही आयुक्तांना दिलेल्या निवेदनासोबत देण्यात आलेली आहे. तसेच याच कालावधीत ‘ ब ‘ व ड ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनाही सदर रक्कम मिळालेली नाही.

त्यामुळे या निवेदनाची दखल घेण्यात येऊन कचरा वेचक कामगारांचा पीएफ व मासिक वेतनाच्या फरकेची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे. निवेदनावर गणेश नागवडे, अतुल क्षीरसागर, शांती गवळी, प्रदीप धाटे, निलेश काळे,  प्रवीण दास यांच्या सह्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.