PCMC : शहरवासीयांनो, एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमात सहभागी व्हा; आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत (PCMC) झालेल्या विविध मोहिमांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरवासियांनी सहभाग घेऊन स्वच्छतेचा संदेश कृतीत रुजविला आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण होऊन त्यात सातत्य रहावे यासाठी शहरातील सर्व आस्थापना, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना, विद्यार्थी, मंडळे, गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत शहरात विविध ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या ‘एक तास स्वच्छतेसाठी’ या उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

येत्या रविवारी 1 ऑक्टोबर रोजी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये ‘एक तास स्वच्छतेसाठी’ उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये नागरी सहभागातून कचरा संकलनाच्या व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या नियोजन आणि व्यवस्थापनाबाबत आयुक्त सिंह यांनी आज (शुक्रवारी) विविध विभागांसमवेत आढावा बैठक घेतली. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे पार पडली, यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, उप आयुक्त अजय चारठाणकर, सह शहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शीतल वाकडे, उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, विजयकुमार काळे, नितीन निंबाळकर, राजेंद्र शिंदे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्यासह सहाय्यक आरोग्य अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत आयुक्त सिंह यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना एक तास स्वच्छतेसाठी मोहिमेच्या अनुषंगाने विविध निर्देश आणि सूचना दिल्या. या मोहिमेमध्ये नागरी सहभाग हा महत्वाचा कणा असून लोकप्रतिनिधींसह विविध घटकांतील प्रतिनिधींचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. मोहिमेचे नियोजन करताना आखणी, व्यवस्थापन आणि नियोजन योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

या उपक्रमासाठी जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने नियोजन करावे तसेच या (PCMC) उपक्रमात लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक, महिला बचतगट, स्वच्छतादूत तसेच अधिकारी, कर्मचारी, अशासकीय व शासकीय संस्था, औद्योगिक कंपन्या, रिक्षा संघटना, टपरी, पथारी हातगाडी संघटना, फेरीवाले, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, पर्यावरण प्रेमी, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आदींना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Pimple Saudagr : नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने मूर्तीदान संकलनात 13 हजार 720 गणेशमूर्तीचे संकलन

शहराला कचरामुक्त करून स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकामध्ये स्वच्छतेची भावना निर्माण झाली पाहिजे. हे शहर कष्टकरी कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यांच्यासह समाजातील सर्व घटकांमध्ये स्वच्छतेचा संदेश रुजल्यानंतर स्वच्छतेच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. त्यातूनच पिंपरी चिंचवड शहर देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर शहर होईल, असा विश्वास आयुक्त सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, आयुक्त सिंह यांनी नवी दिशा उपक्रमाचा देखील आढावा घेतला. या उपक्रमाचे योग्य पद्धतीने ब्रँडींग करून रोल मॉडेल तयार झाले पाहिजे, यासाठी संबंधित विभागांनी उपक्रमासाठी आवश्यक वस्तू, साहित्य पुरवठा तसेच स्थापत्य व विद्युत विषयक कामे प्राधान्याने करावीत, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. या उपक्रमाचे मूल्यांकन करून स्पर्धा घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.