Pimpri News : हुतात्मा बाबू गेनू यांना पालिकेच्या वतीने अभिवादन

एमपीसी न्यूज – हुतात्मा बाबू गेनू यांच्या शहीद दिनानिमित्त पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आज (दि.12) हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रतिमेस उपमहापौर हिराबाई घुले यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव ता्लुक्यात जन्मलेल्या बाबू गेनू सैद यांचे नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्य होते. मुंबईत गिरणीत काम करून ते उदरनिर्वाह करीत असत. पण मनात स्वातंत्र्याचा ध्यास होता. 1930 साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले.

12 डिसेंबर 1930 रोजी विदेशी कपडे घेऊन एक ट्रक आला. दुकानाकडे जाणारा ट्रक बाबू गेनू यांनी अडवला. पोलिसांनी त्यांना बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला पण बाबू गेनू रस्त्यावरच पडून आडवे झाले. ते ट्रक पुढे जाऊ देईनात. उद्दाम इंग्रज ड्रायव्हरने ट्रक या 22 वर्षाच्या तरूणाच्या अंगावरून पुढे नेला. बाबु गेनूंना हौतात्म्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.