PCMC : पिंपरी महापालिकेचे पाच जलतरण तलाव अद्यापही बंदच

 एमपीसी न्यूज –  उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील नागरिकांची (PCMC) पाऊले पोहायला जाण्यासाठी जलतरण तलावाकडे वळत आहे, मात्र महापालिकेचे शहराच्या विविध भागातील 13 जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू आहेत. तर, पाच तलाव अद्यापही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळेगुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत 13 जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. मार्च महिना सुरू झाला असताना वातावरणातील तापमानही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून पोहोण्यासाठी जलतरण तलावांवर गर्दी होवू लागली आहे. पालिकेच्या जलतरण तलावावर एक तास पोहोण्यासाठी वीस रूपये शुल्क आकारण्यात येते.

तसेच मासिक पास 500 रूपये, तिमाहीसाठी 1200 तर वार्षिक 4500 रूपयापर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे पालिकेच्या तलावावर उन्हाळ्यात प्रचंड मोठी गर्दी असते. मात्र, महापालिकेने योग्य नियोजन न केल्यामुळे उन्हाळा सुरू झाला असतानाही पाच तलाव अद्याप कुलूप बंद आहेत. थेरगाव, मोहननगर, यमुनानगर, निगडी आणि भोसरी येथील जलतरण तलावाचे कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना, खेळाडूंना खासगी जलतरण तलावावर जास्त पैसे मोजून पोहोण्यासाठी जावे लागत आहे. दरम्यान, महापालिकेच्या तलावावर पोहोण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्यात येत आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाने मासिक पासही ऑनलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरू असणारे तलाव

नेहरुनगरमधील कै. अण्णासाहेब मगर, पिंपळेगुरव येथील कै. काळूराम जगताप, पिंपरीवाघेरे, कासारवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर, केशवनगर येथील कै. वस्ताद बाळासाहेब गावडे , सांगवीतील बाळासाहेब शितोळे आणि संभाजीनगर येथील साई अक्वामरिन हे आठ तलाव सुरु आहेत.

बंद तलाव

थेरगावातील खिंवसारा पाटील, मोहननगर येथील राजश्री शाहू महाराज, यमुनानगर येथील मीनाताई ठाकरे, प्राधिकरणातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि भोसरीतील कै. बाळासाहेब लांडगे हे पाच तलाव बंद (PCMC) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.