Pimpri News : शिवशाहीरांना श्रद्धांजली वाहून महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब

एमपीसी न्यूज – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (सोमवारी) श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली वाहून सभा कामकाज गुरुवार (दि.18) दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज (सोमवारी) आयोजित केली होती. उपमहापौर हिराबाई घुले सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. नाटककार, दिग्दर्शक, व्याख्याते, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज (सोमवारी) पहाटे पुण्यात निधन झाले. भाजपचे माऊली थोरात यांनी शिवशाहीरांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना मांडली, त्याला केशव घोळवे यांनी अनुमोदन दिले.

भाजपचे मोरेश्वर शेडगे म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अविष्कार, करिष्मा बाबासाहेबांनी सर्वांसमोर आणला. इतिहासात त्यांचे मोठे योगदान आहे. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, छत्रपती शिवरायांचे चरित्र घराघरांमध्ये आणि जण माणसांमध्ये पोहोचवण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आपले आयुष्य राष्ट्राकरिता अर्पण केले होते.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रसार करण्यासाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य घालविले. त्यांनी 12 हजारहून अधिक व्याख्याने महाराष्ट्रात दिली. जाणता राजाच्या माध्यमातून त्यांनी शिव छत्रपतींचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहचवला. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरले. त्यांच्या निधनाने इतिहासकार हरपला आहे. त्यांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. उपमहापौर हिराबाई घुले यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज गुरुवार (दि.18) दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तब्बल तीन पिढ्यांसमोर शिवचरित्र मांडलं. त्यांनी शिवशौर्य आणि शिवकार्य सांगून चांगला समाज घडविण्यात योगदान दिले. पुरंदरे यांनी त्यांचे आयुष्य संपूर्ण पणाने छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलं. देश, धर्म आणि देवासाठी म्हणून त्यांनी कृती केली. संशोधन, लिखाणाबरोबर जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो व्याख्याने देऊन त्यांनी केलेले कार्य महान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.