PCMC : पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या जलप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय; तांत्रिक तपासणी खर्चास मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पवना, इंद्रायणी, व मुळा नदीच्या जलप्रदूषणावर(PCMC) कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने तांत्रिक तपासणी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.

या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजूरी दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, विजयकुमार खोराटे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 3 बुर्डे वस्ती, पठारेमळा व लगतच्या इतर परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरूस्ती एम.पी.एम, हॉटमिक्स पद्धतीने करण्यासाठी तसेच विविध ठिकाणच्या रस्त्यावरील चरांची व डांबरी रस्त्यांची दुरूस्ती हॉटमिक्स पद्धतीने करण्यासाठी येणाऱ्या खर्चास, प्रभाग क्रमांक 11 मधील सुदर्शननगर, शरदनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी तसेच प्रभाग क्रमांक 8 मधील श्वान दफनभूमी येथील मोकळ्या जागेमध्ये डॉग केजसाठी अद्ययावर शेड्स तयार करण्यासाठी व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

Chinchwad : “जोडी तुझी माझी” कार्यक्रम रंगतदार ठरला

चऱ्होली परिसरातील विविध रस्त्यांचे खडीकरण व बीबीएम करण्यासाठी तसेच ताब्यात आलेल्या रस्त्यांचे खडीकरण व बीबीएम करण्यासाठी आणि चऱ्होली, मोशी आणि विविध ठिकाणचे रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास, महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे ऑनलाईन हयातीच्या दाखल्याकरीता केवायसी करण्याच्या अनुषंगाने एजन्सीची नेमणुक करण्यासाठी आणि महापालिकेच्या मंजुर विकास योजनेतील मौजे तळवडे येथील 18 मीटर रूंद डी.पी रस्ता, भारत वजन काटा ते सोनावणे वस्तीला जोडणारा 18 मीटर रूंद डी.पी रस्ता, मौजे थेरगाव येथील नियोजित 12 मीटर रुंदीच्या रस्ता, मौजे थेरगाव येथील नियोजित 12 मीटर रूंदीचा रस्ता या रस्त्यांमधील बाधित जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारितील तळेगाव औद्योगिक क्षेत्र फेज-2मधील महापालिकेच्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेसाठी ब्रेक प्रेशर (बी.पी.टी) बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

‘’जल्लोष शिक्षणाचा’’ या योजनेंतर्गत थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण उर्दू प्राथमिक शाळा, चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदीर मुले क्र. 1, भोसरी येथील इंद्रायणीनगर प्राथमिक शाळा, पिंपरी येथील संत तुकाराम नगर मुले प्राथमिक शाळा, पिंपळेगुरव येथील प्राथमिक शाळा क्र. 54, चिंचवड स्टेशन येथील फकीरभाई पानसरे उर्दु प्राथमिक शाळा या शाळांची स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 15 मधील हेडगेवार भवनाजवळ अग्निशमन केंद्र उभारणे व इतर अनुषंगिक कामे करणे या कामकाजाचा अंदाजपत्रकात समावेश करण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच अनामत ठेव पद्धतीने पवना नदीवर मौजे शिवणे व मौजे गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे येथील प्रगतीपथावर असलेल्या कोल्हापुर पद्धतीने बंधारा बांधण्याच्या कामाच्या अंदाजपत्रकीय रकमेस बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.