PCMC: लेखा अधिकारी, लेखा परीक्षकांचा अभिप्राय घेऊनच विषयपत्र सादर करा; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विविध विभागांमार्फत स्थायी समिती व महापालिका सभेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणारे सर्व विषय हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि मुख्य लेखा परीक्षक यांचे अभिप्राय घेऊनच सादर करावेत, असा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी काढला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर विकासाच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विविध विकास कामे, प्रकल्प राबविण्यात येतात. यासाठी संबंधित विभागाकडून प्रस्ताव अथवा विषय स्थायी समिती आणि महापालिका सभेच्या मान्यतेसाठी आयुक्तांकडे सादर केले जातात. विषयपत्र विशेषतः विकासकामे, वस्तु व सेवा खरेदी व आर्थिक बाबींशी निगडित असतात. वास्तविक असे विषयपत्र सादर करताना ते मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे व मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले यांचे अभिप्राय न घेता आयुक्तांकडे सादर केले जात असल्याची बाब त्यांच्या निदर्शास आली आहे.

Pune : विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा जिजाऊ-सावित्री-फातिमा पुरस्काराने सन्मान

त्यामुळे निविदा विषयक सर्व प्रकारचे विषयपत्र हे (PCMC) मुख्य लेखा परीक्षक यांचे अभिप्राय घेऊन आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्यामार्फत सक्षम मान्यतेकामी सादर करावेत. तसेच आर्थिक बाबीशी निगडित निविदा कामकाजास मुदतवाढ, अंदाजपत्रकातील तरतूद वर्गीकरण व एखाद्या निर्णयामुळे होणारे आर्थिक दायित्व अशा प्रकारचे प्रस्ताव मुख्य लेखा व वित्त अधिकारी कोळंबे यांचे अभिप्राय घेऊन मान्यतेकामी सादर करावेत. त्यांचे अभिप्राय न घेता काही त्रुटी अथवा कायदेशीर बाबी उद्‌भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी विभागप्रमुखावर राहील, असा इशाराही आयुक्त सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.