Pimpri : नो हॉर्न प्लिज !! कारण 12 सप्टेंबर आहे ‘नो हॉर्न डे’ !

एमपीसी न्यूज- विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. या उद्देशाने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर आणि जिल्ह्यात 12 सप्टेंबर हा दिवस ‘नो हॉर्न डे’ म्हणून पाळला जाणार आहे. अशी माहिती पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी दिली आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या नेतृत्वाखाली आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत व विनोद सगरे यांच्या संकल्पनेतून पुणे शहर आणि जिल्ह्यात ‘नो हॉर्न डे’ पाळला जाणार आहे. या मोहिमेत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी, पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे पदाधिकारी यशवंत कुंभार, निलेश गांगुर्डे, निखिल बोराडे, विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तसेच सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.

या दिवशी वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वाहनांना ‘नो हॉर्न’चे स्टिकर लावण्यात येणार असून वाहनचालकाच्या हाताला ‘नो हॉर्न’चा बँड बांधून हॉर्न न वाजविण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच ड्रायव्हिंग स्कूल आणि आरटीओ कार्यालयाच्या परिसरात जनजागृती करणारे फलक लावण्यात येणार आहेत.

पुण्यात 36 लाख वाहने रोज रस्त्यावरून धावत असतात. शिवाय बाहेरगावाहून देखील अनेक वाहने पुण्यात येत असतात. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलेली असताना या कोंडीतून वाट काढताना अनेक वाहनचालक गरज नसतानाही हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषणात भर घालत असतात. बऱ्याच वाहनचालकांना विशेषतः युवकांना दुचाकी चालवताना रस्ता मोकळा असला तरीही विनाकारण हॉर्न वाजविण्याची खोड असते.

शाळा, हॉस्पिटल, सरकारी कार्यालये, न्यायालय अशा शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविण्यावर बंदी घालण्यात आलेली असतानाही सर्रासपणे हॉर्न वाजवून शांततेचा भंग केला जातो. अशा वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुणे शहर आणि जिल्ह्यात 12 सप्टेंबर हा दिवस ‘नो हॉर्न डे’ म्हणून पाळला जाणार आहे. भविष्यात हा उपक्रम संपूर्ण राज्यातील सर्व 51 परिवहन कार्यालये, ड्रायव्हिंग स्कूल यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा मानस असल्याचे राजू घाटोळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.