Pimpri: निगडी-रुपीनगर मधील तरुणाचे रिपोर्ट  पॉझिटीव्ह; आजपर्यंत 68 जणांना कोरोनाची लागण

सक्रिय रुग्णांची संख्या पोहचली 48 वर; 20 रुग्ण कोरोनामुक्त; तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी रुपीनगर परिसरातील एका 26 वर्षाच्या तरुणाचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 48 वर पोहचली आहे. आजपर्यंत 68 जणांना  कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 20 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने बुधवारी (दि.22)  81 संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज (गुरुवारी) आले आहेत. त्यामध्ये 26 वर्षीय तरुणाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. हा तरुण निगडी- रुपीनगर परिसरातील रहिवासी आहे. त्याला कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली याची माहिती समजू शकली नाही.

मागील 16 दिवसांत 47 नवीन रुग्णांची भर!

शहरात 8 एप्रिलपासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल  रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार, 17 एप्रिल रोजी दोन, 18 एप्रिल रोजी सात, 19, 20, 21  एप्रिल रोजी प्रत्येकी एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.  22 एप्रिल रोजी तिघांचे तर आज गुरुवारी (दि. 23) एप्रिल एकाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील सोहळा दिवसात तब्बल 47 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 68 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 20 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 48 रुग्ण शहरात आहेत. त्यातील वायसीएममध्ये 37 रुग्णांवर आणि शहरातील नऊ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका हद्दीबाहेरील दोन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. सोमवारी (दि.20) निगडी भागातील रहिवाशी पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा रविवारी (दि.20) एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.