Pimpri : महामानवांच्या वैचारिक प्रबोधनात्मक चळवळीला गती द्या; विचारवंताचा सूर

एमपीसी न्यूज – महामानवांचे  विचार आत्मसात करुन त्याचा अंगीकार करणे ( Pimpri ) गरजेचे आहे. समाजातील जातसंघर्ष टोकाचा होत जातो तेव्हा महापुरूषांचे हेच विचार समाज जोडण्याचे काम करत असतात. त्यातूनच समाजाच्या उन्नतीचा मार्ग जात असतो. सामाजिक क्रांती एका दिवसात घडत नसते, त्यासाठी महापुरूषांच्या अनुयायांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी सामाजिक क्रांतीचे आणि विद्रोहाचे तत्वज्ञान आपल्याला दिले आहेत. त्यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सुप्रबोधन होणे गरजेचे असून समाजातील वंचित घटकांना त्यांचे हक्क अधिकार प्राप्त करून देण्यासाठी महामानवांच्या वैचारिक प्रबोधनात्मक चळवळीला गती दिली पाहिजे, असा सूर ‘महात्मा फुले आणि समाज प्रबोधनाची चळवळ’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘महात्मा फुले आणि समाज प्रबोधनाची चळवळ’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला.

या परिसंवादात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ( Pimpri ) माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, विचारवंत गंगाधर बनबरे, साहित्यिक डॉ. प्रदीप आवटे, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण सहभागी झाले होते. त्यावेळी आपले मत व्यक्त करताना ते बोलत होते.

डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने पुढे पाऊल टाकल्यास अपेक्षित परिवर्तन गतीने होऊ शकते. यासाठी महामानवांच्या विचारांचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करण्याची आवश्यकता आहे. आधुनिक युगात आर्थिक बाबींचा कटाक्षाने विचार करून समाजाची दिशा निश्चित केली पाहिजे.

Pimpri : पुनर्जन्म कोणी पाहिला नाही, पण…

त्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी महापुरूषांच्या विचारांचा आधार घेतल्यास यशाची प्राप्ती निश्चितपणे होते. शिवाय समाज सदृढ होण्यास देखील मदत होते. प्रतिकुल परिस्थितीत समाजातील स्त्रीयांना स्वावलंबी बनविण्याचे काम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी केले. वर्णव्यवस्थेमुळे बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते.

ही शिक्षणाची द्वारे फुले दाम्पत्यांनी उघडी केली. शिक्षणाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. समाजातील अनिष्ठ  रुढी परंपरा आणि विषमतावादी वर्णव्यवस्थेविरूद्ध आवाज उठवून त्यांनी विविध स्तरावर चळवळी सुरू केल्या. त्यातूनच समतावादी समाजाची निर्मिती झाली, असे मतही देशमुख यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड केवळ उद्योगनगरी नसून कामगारनगरी देखील आहे. या शहराच्या जडणघडणीत कामगारांचा सिंहाचा वाटा आहे, असे नमूद करून गंगाधर बनबरे म्हणाले, सुप्रबोधनातून विज्ञानवादी समाजनिर्मिती होत असते तर कुप्रबोधनातून विषमतावादी विकृती जन्माला येते. त्यामुळे निकोप समाजनिर्मितीसाठी शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांसारखे समतावादी विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे.

समाजप्रबोधनाची चळवळ उभी करणाऱ्या महापुरूषांना जाणीवपूर्वक जातींच्या चौकटीत बंद केले जाते. त्यामुळे समाजातील दरी वाढत जाते. महात्मा जोतीराव फुले यांनी गुलामगिरी, जातीवाद, विषमता, अनिष्ठ रुढी परंपरा यांवर प्रहार केला. शिक्षणाची मक्तेदारी मोडीत काढत प्रबोधनाच्या माध्यमातून वंचित घटकांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले. त्यांचे विचार आजही समाजाच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण आहेत.

Mp Shrirang Barne : कर्जतमधील ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण, सिंहगड एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी वेगळा डबा

प्रा. दिलीप चव्हाण म्हणाले, आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला जातीच्या चौकटीत उभे ( Pimpri ) करून पाहिले जाते. समाजामध्ये होणारा बदल हा केवळ राजकीय बदल नाही. कुटुंब नावाची संस्था तुम्हाला कितीही प्रिय असली तरी ही संस्था पितृसत्तेने आणि जातीव्यवस्थेने ग्रस्त असेल तर ते आदर्श कुटुंब ठरू शकत नाही, असे महात्मा फुले यांचे विचार होते.

आदर्श कुटुंब हे कोणताही धर्म, विचार आणि संस्कृती अनुसरण्याचे स्वातंत्र्य देते ही संकल्पना फुले यांनी मांडली होती, असे डॉ. दिलीप चव्हाण यांनी सांगितले. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून शिक्षण, शेतकरी, कामगार, दलित आणि स्त्री-मुक्तीच्या चळवळींचा उगम झाला. सत्यशोधक चळवळीने शिक्षणावर अधिक भर दिला.

या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 150 वर्षे पुर्ण झाली तरी देखील सरकारसह इतरांनीदेखील ( Pimpri ) त्याची दखल घेतली नाही ही शोकांतिका आहे. वर्णभेदाविरूद्ध आणि आधुनिकतेच्या बाजूने उभी असलेली सत्यशोधक चळवळ थेटपणे संघर्ष करत होती, मात्र नंतरच्या कालखंडात सत्यशोधक समाजाच्या वारसांना बहुजन समाजातील साखरसम्राट, शिक्षणसम्राट हे शत्रु वाटेनासे झाले आहेत. सत्यशोधकी बाणा नाकारल्यामुळे परिवर्तनाचे चाक निम्म्यावर रुतले असून सत्यशोधक समाजाच्या दीडशेव्या वर्षात ही गतीरुद्धता भेदली जाण्याचा विचार व्हावा, असे डॉ. चव्हाण म्हणाले.

डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, इतिहासांच्या पानांमध्ये आपण अडकून बसल्याने महापुरूषांच्या वास्तववादी प्रगत विचारांपासून आपण दूर जात आहोत. महापुरूषांचे नाव उच्चारणे आणि त्यांचे विचार सांगणे सहज सोपी गोष्ट असते परंतु ते व्यक्तीगत आयुष्यात कृतीत उतरविणे अवघड गोष्ट असते. त्यामुळे महापुरूषांच्या विचारांचा अंगीकार स्वत:पासून करायला हवा.

कृतिशील जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. महापुरूषांनी एकतेचा संदेश दिला पण आज या विचारांचा विसर पडल्याने समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले जात आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांसारख्या महापुरूषांच्या विचारांचा पराभव आपणच करत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. महात्मा फुले आधुनिक विचारांचे व्यक्तिमत्व होते.

जनतेशी संवाद साधून त्यांनी पुस्तक लेखन केले. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक ( Pimpri ) यांना पुस्तकाचे प्रकरण वाचून दाखवत त्यांचा अभिप्राय घेऊन ते पुस्तक लेखन करत होते ते त्यांचे वेगळेपण होते. सामाजिक क्रांतीची, प्रबोधनाची सुरुवात महात्मा फुलेंच्या साहित्यातून झाली आणि त्यांचे हेच समाजप्रबोधनाचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून पुर्ण केले, असे मतही डॉ. आवटे यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, परिसंवादानंतर सुप्रसिद्ध लोककलावंत मीरा उमाप आणि सहकाऱ्यांचा ‘प्रबोधनात्मक सांस्कृतिक जलसा’ हा कार्यक्रम पार पडला. तर लोकराजा नाट्य, कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्था प्रस्तुत आणि सिनेअभिनेते व गायक अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले लिखित ‘तृतीय रत्न’ हे नाटक सादर करण्यात आले.

जातवर्चस्व, अंधश्रद्धा तसेच भुलथापांना बळी न पडण्याचा संदेश या नाटकाच्या माध्यमातून देण्यात आला. सकाळच्या सत्रात डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी ‘पुन्हा क्रांती ज्योती’ हा महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. त्यानंतर शाहीर बापू पवार यांच्या पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. साधना मेश्राम यांनी गीतगायनाच्या माध्यमातून महात्मा फुले यांचे विचार ( Pimpri ) मांडले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.