Pimpri : पुनर्जन्म कोणी पाहिला नाही, पण…

एमपीसी न्यूज – पुनर्जन्म कोणी पाहिला नाही पण (Pimpri)अवयवदानाने याच जन्मात पुन्हा एकदा जन्म घेता येतो, किंबहुना तो पुनर्जन्मच असतो. एक व्यक्ती अवयवदान करून इतरांना जीवनदान देऊ शकते. यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीच्या आयुष्यात एक नवी सकाळ होऊ शकते, असा विचार अवयव प्रत्यारोपन अधिकृतता समितीचे राज्यसदस्य श्रीकांत आपटे यांनी मांडला.

भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने (Pimpri)संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अवयवदान व प्रत्यारोपन यावर आधारित ‘पुन्हा फिरून जन्मेन मी’ या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपटे बोलत होते.

Maharashtra : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या व्याख्यानादरम्यान आपटे यांनी देहदान आणि अवयवदान यातील फरक उपस्थितांना समजावून सांगितला. तसेच मृत्यु दोन प्रकारचा असून मृत्युच्या कारणांवरुन अवयवदानाची आणि देहदानाची पात्रता ठरवता येते असेही ते यावेळी म्हणाले. याव्यतिरिक्त अवयवदानाची पात्रता, कोणकोणते अवयव दान करता येतात, अवयवदानाचे प्रमाणपत्र कोठे मिळते, दान देण्यात आलेल्या अवयवांचे वितरण कसे करता येते अशा विविध विषयांवर तसेच याबाबत असलेल्या कायद्याची माहितीचे सविस्तर मार्गदर्शन आपटे यांनी केले.

मृत्युची कारणे पाहून देह शीतगृहात ठेवता येऊ शकतो आणि त्यानंतर त्या देहाचा उपयोग वैद्यकीय प्रशिक्षण व संशोधनासाठीही करता येतो, असे डॉ. अरूण हळबे म्हणाले. तसेच देहदान कोण करू शकतो, ते कोठे स्विकारले जाते, त्यासाठी डॉक्टरांच्या कोणत्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते, ते किती कालावधीत करता येते याबद्दलही डॉ. हळबे यांनी सविस्तर माहिती दिली.

डॉ. रोहिणी आठवले यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे नेत्रदान व त्वचादान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर भावासाठी यकृतदान करून त्याला जीवनदान देणाऱ्या संगीता नायक यांनी त्यांचा अवयवदानाचा अनुभव कथन केला. सायली अष्टेकर यांनी त्यांच्या मुलीला किडनी प्रत्यारोपनासाठी आलेल्या अडचणी सांगितल्या आणि अवयवदानामुळे त्यांची मुलगी मृत्युच्या दारातून कशी परत आली याबद्दलचा भावनिक अनुभव सांगितला. त्यानंतर नरेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या मुलाच्या यकृतदानाच्या आठवणी सांगितल्या तर मृत्युंजय फाऊंडेशनचे अवयवदान प्रबोधनासाठी पदयात्रेचा किर्तीमान प्रस्थापित करणारे सुनील देशपांडे यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.

सायली लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या लता गजभिव यांनी अवयवदान हे किती श्रेष्ठदान आहे याबद्दल बोलताना त्यांनी स्वत:च्या मुलीच्या मृत्युची कहानी सांगितली. अवयवदान मिळाले असते तर तिचा जीव वाचू शकला असता असेही त्या म्हणाल्या. तसेच या सामाजिक कार्यात नि:संशयपणे हातभार लावण्याचे नागरिकांना आवाहन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.