_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri: परवानगी असतानाही बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई – अरुण पवार

Action against vehicles carrying construction materials despite permission; allegations of builders

एमपीसी न्यूज – लॉकडाउनची नियमावली शिथिल होत असताना शहरातील बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांवर नायब तहसिलदारांकडून कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे आरटीओ कार्यालय बंद असतानाही सध्या पावत्या करून जून महिन्यात दंडाची रक्कम भरण्यास सांगितली जात आहे, असा आरोप बांधकाम व्यावसायिकांकडून केला जात आहे.

कंटेन्मेंट झोनच्या हद्दीबाहेर शहर व जिल्ह्यात अर्धवट असलेले बांधकाम प्रकल्प सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

एकीकडे अर्धवट बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्यास परवानगी दिली असली, तरी बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत बांधकाम व्यावसायिक अरुण पवार यांनी सांगितले, भोसरी हद्दीत बांधकामाच्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून दंडाच्या पावत्या दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे वाहनांच्या वजन वाहून नेणाऱ्या क्षमतेएवढाच माल वाहून नेला जात असताना आणि आरटीओ कार्यालय बंद असतानाही 26 मे रोजीची दंडाची पावती दिली आहे आणि एक जूननंतर दंड भरण्यास सांगण्यात आले आहे.

आताच दंडाच्या पावत्या करण्याची घाई का केली जात आहे ? मंगळवारी बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर भोसरी येथे अशीच जाणूनबुजून कारवाई करून वाहन पाच-सहा तास थांबवून ठेवले. त्यामुळे कामाचा खोळंबा झाला.

कारवाई अशीच सुरू राहिली, तर बांधकामे पूर्णत्वास कशी जाणार आहेत. बांधकामे सुरू करून बांधकाम कामगारांच्या हाताला काम देण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानुसार आम्ही अर्धवट बांधकामे पूर्ण करण्यासाठी कामगारांचे नियोजन करून काम  सुरू केले आहे.

मात्र, आरटीओ आणि तहसीलदार यांच्याकडून जाणूनबुजून बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याने कोरोना महामारीच्या कठीण काळात कामगारांना कसे काम देणार, असा सवाल पवार यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.