Pimpri : महेश लांडगे यांची भेट घेऊन प्रचाराची रणनिती आखणार – शिवाजीराव आढळराव

'नात्या-गोत्या'चा प्रश्न नाही, महेश लांडगे युतीच्या उमेदवाराचे काम करणार

साडेचार वर्षात जे पेरले ते एप्रिल महिन्यात उगवणार

एमपीसी न्यूज – हिंदु मतांची विभागणी होऊ नये यासाठी शिवसेना-भाजपची युती व्हावी यासाठी मी पहिल्यापासून आग्रही होतो. आता युती झाली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते, नेत्यांचे मनोमिलन झाले असून सर्व मनाने एकत्र आले आहेत. मतदार संघातील शिवसेना-भाजपच्या आमदारांची भेट घेऊन प्रचाराची रणनिती आखणार असल्याचे सांगत शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे युतीच्या विचाराचे आहेत. त्यामुळे ते युतीच्या उमेदवाराचे काम करतील. नात्या-गोत्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना भेटून प्रचाराची रणनिती आखणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत खासदार आढळराव पाटील आज (गुरुवारी)आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

युतीसाठी मी पहिल्यापासून आग्रही होतो. काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेत येण्याची संधी न देण्यासाठीच एकत्र लढणे फायद्याचे ठरणार आहे. हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती झालीय. भोसरी मतदार संघाचा विकास झाला आहे. आमदार महेश लांडगे यांच्यावर मी कधी वैयक्तिक आरोप केले नाहीत. त्यांनी देखील माझ्यावर वैयक्तीक आरोप केले नाहीत. कामातील काही गोष्टी आवडल्या नाही. त्या समोरासमोर मांडल्या असून निवडणुकीत महेश लांडगे आपलाच प्रचार करतील असा विश्वास खासदार आढळराव यांनी व्यक्त केला.

लोकसभा मतदारसंघातील युतीच्या प्रत्येक आमदाराला सोबत घेऊन प्रचार करणार आहे. महेश लांडगे यांच्यावर मी कधीच वैयक्तिक टीका केली नव्हती. युती झाली मनं नक्कीच जुळून येतील. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची एकत्र काम करण्याची मानसिक तयारी झाली आहे. देशावर लष्करी संकट आहे. आता नरेंद्र मोदींच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या साडेचार वर्षात मतदार संघात सुमारे 1400 ते 1500 कोटी रुपयांची कामे मंजूर करुन आणली आहेत. त्यापैकी अनेक कामे झाली आहेत. अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. तर, काही कामांचा आराखडा बनविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे साडेचार वर्षात जे पेरले आहे, ते एप्रिल महिन्यात उगवणार आहे. दहा वर्ष झोपलेल्या विरोधकांना मी काही कामे केली आहेत. हे माहीतच नाही. त्यामुळे ते फलकबाजी करत आहेत. त्याला मी उत्तर पण दिले नाही. मी जे केले, ते फलकांच्या माध्यमातून सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.