Pimpri: ‘विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यास परवानगी द्यावी’

नगरसेविका प्रियंका बारसे यांची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन सुरु आहे.  15 मार्चपासून शाळा बंद आहेत. तेव्हापासून विद्यार्थ्यांना दिला जाणार  शालेय पोषण आहार बंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना या शालेय पोषण आहाराची  खरी गरज आहे.  पण, शाळा बंद असल्यामुळे आम्ही तो मुलांपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यासाठी नियमाप्रमाणे शहरी भागातील विद्यार्थ्यांचा पोषण आहार त्यांच्या पालकांकडे देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत नगरसेविका बारसे यांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा  गायकवाड यांना निवेदन मेल केले आहे. त्यात   म्हटले आहे की, 15 मार्च पासून महाराष्ट्र राज्यातल्या नव्हे तर संपूर्ण भारतातील शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारा शालेय पोषण आहारही तेव्हापासून बंद आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना या शालेय पोषण आहाराची  खरी गरज आहे.

 

पण शाळा बंद असल्यामुळे आम्ही तो मुलांपर्यंत पोहोचवू शकत नाही. सरकारने ग्रामीण भागांमधील शाळांना उपस्थित असलेल्या पालकांकडे विद्यार्थ्यांना डाळ-तांदूळ व कडधान्याच्या रूपाने नियमाप्रमाणे जो काही त्यांचा पंधरा-वीस दिवसाचा शालेय पोषण आहार आहे तो वाटपास  परवानगी दिली आहे.

त्याच धर्तीवर  शहरी भागातही परवानगी द्यावी. शहरी भागात राहत असलेले सर्वच विद्यार्थी चांगल्या परिस्थितीतील नाहीत. शिवाय शालेय पोषण पुरवठादारांकडे हा डाळ-तांदूळ आत्ता उपलब्ध आहे. जूनपर्यंत त्याला कीड लागण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तो वाया जाण्याची भिती आहे.

 

शहरी भागांमध्ये वाढती महागाई,  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेक नागरिक गावाला जावू शकले नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. त्यासाठी ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागाला हा शालेय पोषण आहाराचा नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना देण्यासाठी परवानगी देण्याची विनंती नगरसेविका बारसे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.