Pimpri: ‘भाजप नगरसेवकाचा महापालिकेच्या भूखंडावर कब्जा’

माजी महापौर मंगला कदम यांचा आरोप 

एमपीसी न्यूज – चिंचवड, संभाजीनगर येथील बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या भूखंडावर भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी अतिक्रमण केले आहे. त्यासाठी सीमाभिंतीची तोडफोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केला.

कदम म्हणाल्या, संभाजीनगर येथील एमआयडीसी जी ब्लॉक येथील एचडीएफसी कॉलनीसमोर महापालिकेचा भूखंड आहे. बस टर्मिनलसाठी हा भूखंड आरक्षित आहे. हा भूखंड बळकाविण्यासाठी भाजप नगरसेवक तुषार हिंगे  फूड फेस्टिव्हल आणि आठवडे बाजार भरवित आहेत. त्यासाठी हिंगे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुपेकर यांनी संगनमताने भूखंडाची सीमाभिंत तोडून जागेचे सपाटीकरण केले आहे.

बस टर्मिनलचा भूखंड  महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी एमआयडीसीकडे कोट्यवधी रुपयांचे विकसन शुल्क भरले आहे. भूखंडावरील अतिक्रमण आणि खासगी वापरापासून संरक्षण करण्याकरिता लाखो रुपये खर्च करुन सीमाभिंत बांधण्यात आली आहे. त्यावर लोखंडी ग्रील टाकून कपाऊंड करण्यात आले होते. परंतु, भाजप नगरसेवक हिंगे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुपेकर यांनी विनापरवाना संरक्षण भिंत तोडून भूखंड बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोघांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

संरक्षण भिंत तोडल्याने महापालिकेचे झालेले आर्थिक नुकसान कार्यकारी अभियंता सुपेकर यांच्या वेतनातून वसूल करण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कदम यांनी दिला. त्याचबरोबर याबाबत आपण आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. याची चौकशी करुन सत्यता आढळल्यास नगरसेवक हिंगे आणि कार्यकारी अभियंता सुपेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे कदम यांनी सांगितले.

आरोप केवळ राजकीय सुडापोटी-तुषार हिंगे

दरम्यान, भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांनी आरोपांचे खंडन केले आहे. तुषार हिंगे म्हणाले, ” केवळ राजकीय सुडापोटी हा आरोप करण्यात येत आहे. सदरच्या जागेवर यापूर्वी सिमेंटचा प्लांट होता. अनेक वर्षे तो तसाच पडून होता. भूमी आणि जिंदगी विभागाकडे पाठपुरावा करून ती जागा रिकामी करून घेण्यात आली आहे. या जागेवर सुबाभुळाची झाडे होती. याठिकाणी गैरप्रकार चालत. वृक्ष प्राधिकरणाची रीतसर परवानगी घेऊन ही झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच सादर जागेसाठी रखवालदार नेमण्याची मागणी केली आहे. फूड फेस्टिवल आणि आठवडे बाजारासाठी भूमी आणि जिंदगी आणि ‘अ’क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिका-याकडून तीन दिवसांसाठी परवानगी घेतली आहे. रितसर परवानगी घेऊनच फूड फेस्टिव्हल आणि आठवडे बाजार भरविण्यात येणार आहे” त्याठिकाणी सीमाभिंत असल्याची आपल्याला कोणतीही माहिती नाही. तसेच बस टर्मिनलबद्दल कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.