Chakan : ओढ्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त

एमपीसी न्यूज – चाकण शहरातील सिटीसर्व्हे नंबर २७२ लगतच्या नैसर्गिक ओढ्यावर केलेले बहुचर्चित अतिक्रमण चाकण नगरपरिषदेच्या वतीने मंगळवारी (दि.१०) रात्री साडेनऊचे सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रात्रभर ही कारवाई सुरु राहणार असल्याचे चाकण नगरपरिषदेच्या सांगण्यात आले.  

मुंबई उच्च न्यायालयात चाकणचे माजी उपसरपंच व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुशंघाने चाकण ( ता. खेड) शहरातील नैसर्गिक ओढ्यावर केलेले अतिक्रमण काढून टाकण्याचा आदेश चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांना दिले होते. मागील काही दिवसांपासून या कारवाईला वेगवेगळ्या कारणांनी स्थगिती मिळाली होती. मात्र मंगळवारी ही कारवाई सुरु करण्यात आली आहे.

सकाळी कारवाईसाठी गेलेल्या प्रशासनाला न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण तीन मजली इमारतीतील साहित्य काढून घेण्यास सायंकाळी सहापर्यंतचा वेळ देण्यात आला. दरम्यान, अतिक्रमण धारक रवींद्र देशमुख यांना नोटीस देण्यात आली. पंचनामा करण्यात आला. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता कारवाई सुरु करण्यात आली.

चाकण पालिकेच्या मुख्याधिकारी नीलम पाटील व चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग घटनास्थळी ठाण मांडून होते. ज्या ओढ्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली व न्यायालयाने अतिक्रमण काढण्याबाबत संबंधित प्रशासनाला आदेश दिले त्या ओढ्यावर सिटीसर्व्हे नंबर २७२ लगतच्या सुमारे तीन एकर जागेत मागील अनेक वर्षांपासून काही व्यावसायिक दुकाने चालवून उदरनिर्वाह करीत आहेत.

या ओढ्याला समांतर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक रस्त्याला खेटून अनेकांची दुकाने आहेत. या अतिक्रमण कारवाई मुळे ओढ्या लगतच्या अन्य व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहे;  तर चाकणकर नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.