Pimpri: भाजपचे प्रभाग क्रमांक 8 आणि 17 वर ‘विशेषप्रेम’ !

उपमहापौर, सभागृहनेतेपद, स्थायी समितीचे सभापतीपद दिले प्रभागाला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे दोन प्रभागावर ‘विशेषप्रेम’ दिसून आले आहे. भोसरीतील प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगर आणि चिंचवडमधील प्रभाग 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर या दोन प्रभागात भाजपने मागील तीन वर्षात महत्वाची पदे दिली आहेत. प्रभाग आठमध्ये दोघांना स्थायी समितीचे अध्यक्षपद, एका नगरसेविकेला दोन वर्ष स्थायीचे सदस्यत्व आणि प्रभागाचे अध्यक्षपद दिले. तर, प्रभाग 17 मधील एकाला उपमहापौर, नगरसेविकेला विधीचे सभापतीपद, एक वर्ष स्थायी समिती, दुस-या नगरसेविकेला दोन वर्ष स्थायीचे सदस्य आणि प्रभागाचे अध्यक्षपद दिले. आता एका नगरसेवकाला सभागृहनेतेपद दिले आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपचे तब्बल 77 नगरसेवक निवडून आले आहे. भाजपची पहिल्यांदाच सत्ता आल्याने पदांसाठी अनेकजण इच्छुक होते. परंतु, त्यामध्ये भोसरीतील प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगर आणि चिंचवडमधील प्रभाग 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगरला भाजपने मोठी आणि महत्वाची पदे दिली.

प्रभाग क्रमांक आठमधून भाजपच्या सीमा सावळे, विलास मडिगेरी, नम्रता लोंढे असे तिघे निवडून आले. त्यापैकी सावळे यांना पहिल्याच वर्ष महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. दुस-यावर्षी मडिगेरी यांना स्थायी समितीचे सदस्य आणि तिस-यावर्षी अध्यक्षपद मिळाले. तर, लोंढे यांना प्रभाग समितीचे अध्यक्षपद आणि दोन वर्ष स्थायी समितीचे सदस्यत्व मिळाले. त्यामुळे प्रभागातील तीनही नगरसेवकांना महत्वाची पदे मिळाली आहेत.

चिंचवडमधील प्रभाग 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगरमध्ये चारही नगरसेवक भाजपचे निवडून आले. नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे निवडून आले. भाजपने कुलकर्णी यांना एक वर्ष स्थायीचे सदस्यपद आणि विधी समितीचे सभापतीपद दिले. तर, करुणा चिंचवडे यांना दोन वर्ष स्थायी समितीचे सदस्यत्व आणि दोनवेळा प्रभाग समितीचे अध्यक्षपद दिले. राष्ट्रवादीचे दिग्गज भाऊसाहेब भोईर यांचा पराभव केलेल्या सचिन चिंचवडे यांना सव्वावर्ष उपमहापौरपद दिले. आता ढाके यांना सभागृह नेतेपद दिले आहे. त्यामुळे चारही नगरसेवकांना महत्वाची पदे मिळाली आहेत. पदे मिळविण्यात हे दोनही प्रभाग यशस्वी ठरले असून या प्रभागांवर भाजपचे ‘विशेषप्रेम’ असल्याचे मागील तीन वर्षात दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.