Pimpri : रखडलेल्या महामंडळावरील नियुक्त्यांना वेग येणार ? प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री आज शहरात

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या कोट्यातील महामंडळाच्या नियुक्त्या पूर्ण करण्याला वेग दिला आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या महामंडळावर नियुक्त्या केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज (सोमवारी)पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत. त्यामुळे ज्यांना पदे मिळाली नाहीत अशा कार्यकर्त्यांना महामंडळावर नियुक्या करण्याची चाचपणी होण्याची शक्यता आहे. तसेच प्राधिकरणाच्या रखडलेल्या सदस्य निवडी मार्गी लागणार का याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आले आहे. तर, माजी पालकमंत्री गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून संसदेत गेले आहेत. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे आज तिघांचाही सत्कार केला जाणार आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या कोट्यातील महामंडळाच्या नियुक्त्या पूर्ण करण्यास वेग दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सहा महिन्यांपुर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती केली आहे. परंतु, अद्यापही प्राधिकरणावरील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच या नियुक्त्या पूर्ण करण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष दानवे, पालकमंत्री पाटील, माजी पालकमंत्री बापट हे शहरात येत आहेत. त्यामुळे महामहामंडळावर नियुक्या करण्याबाबत चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांना एकही पद मिळाले नाही. त्या कार्यकर्त्यांना पदे देण्याबाबत चाचपणी केली जाऊ शकते. प्राधिकरणाच्या रखडलेल्या सदस्य निवडी मार्गी लागणार का याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे, पालकमंत्री पाटील याबाबत काही सुतोवाच करतात का याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.