Lockdown Positive effect: नीले गगन के तले…

Pimpri Chinchwad city after lockdown and Cyclone Nisarga, sahyadri mountain range clearly visible from the city. पिंपरी, चिंचवड, पुण्यातून शहराच्या आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगा स्पष्ट दिसू लागल्या. सकाळी सकाळी तर शहरामधून लगतच्या सिंहगडाचे देखील नयनरम्य दर्शन होऊ लागले.

एमपीसी न्यूज (Photo/Video Tushar Shinde) – क्षितिजावर दूरवर दिसणा-या सह्याद्रीच्या विस्तीर्ण डोंगररांगा, निळेशार आकाश, त्या निळेपणाला आपल्या पांढ-या रंगाने खुलवणारे, मधूनच उगाचच विहरणारे पांढरेशुभ्र ढग, मनसोक्त, स्वच्छंद उडणारे पक्षी, उगवतीच्या सूर्याची कोवळी किरणे, निळ्या पांढ-या रंगात मधूनच येणारी हिरव्यागार रंगाची वृक्षसंपदा आणि एरवी त्रासदायक वाटणा-या पण या चित्रात शोभून दिसणा-या इमारती असं वेगळंच पण आश्वासक चित्र पिंपरी चिंचवडमध्ये दिसून आले.

‘नीले गगन के तले’ हे गाणे आपल्या खूप चांगल्या परिचयाचे आहे. त्यात दिसणा-या हिमालयाच्या शुभ्रधवल रांगा, हिरवेगार सूचिपर्णी वृक्षांचे डोंगर, त्यातून वाहणारे झरे अगदी चित्रातल्या सारखे सुंदर दृश्य. अगदी असंच म्हणजे हिमालयाच्या शुभ्रधवल रांगा नाहीत पण आपल्या रांगड्या सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगा मागील काही दिवसांपासून पुणेकर पाहू शकत आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरे लॉकडाऊन झाली. पण त्यामुळे वाहतूक कमी झाल्याने शहरातील प्रदूषण घटल्याने शहरांनी आणि आजूबाजूच्या निसर्गाने मोकळा श्वास घेतला. पिंपरी, चिंचवड, पुण्यातून शहराच्या आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगा स्पष्ट दिसू लागल्या. सकाळी सकाळी तर शहरामधून लगतच्या सिंहगडाचे देखील नयनरम्य दर्शन होऊ लागले. त्यातच दोन दिवसांपूर्वी निसर्ग या चक्रीवादळाचा परिणाम शहरावर दिसला. शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची पडझड झाली. पण त्यामुळे वातावरणातील प्रदूषण मात्र निश्चितच कमी झाले.

खरंतर हे पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस. काळ्याकभिन्न ढगांनी आभाळ गच्च भरुन येणे हेच यावेळी दिसते. पण कदाचित चक्रीवादळ येऊन गेल्यामुळे वातावरण स्वच्छ झाले असावे. एरवी ज्याला आपण सिमेंट क्रॉंक्रीटचे जंगल म्हणतो ते आज मात्र वेगळेच भासत होते. आकाशाची निळाई मनाला वेधून घेत होती. बाकीच्या सगळ्या समस्यांचा यामुळे नक्कीच विसर पडला. खरंच निसर्गासारखा गुरु दुसरा कोणीही नाही. तुम्ही त्यावर कितीही आक्रमण केले तरी आपल्याला भरभरुन देणारा देखील निसर्गच असतो.

काही दिवसांपूर्वी पंजाबमधून स्पष्ट दिसणा-या हिमालयाच्या रांगाचे फोटो आपण सोशल मिडियावर पाहिले असतीलच. त्याच धर्तीवर सध्या पुणेकर देखील सह्याद्रीच्या रांगांचे विलोभनीय दर्शन घेऊ शकत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.