Chakan: भामा आसखेड धरणातील पाण्याचा वाद ऐरणीवर; पाईपलाईनला विरोध करणाऱ्या 76 जणांवर गुन्हा

Chakan: Water dispute in Bhama Askhed dam; Crimes against 76 people opposing the pipeline

एमपीसी न्यूज- भामा आसखेड धरणातील पाणी पुणे महापालिकेसाठी नेण्याबाबत स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला आहे. हा वाद मागील अनेक दिवसांपासून सुरु असून या वादाला कोरोना काळात पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.

बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरु असताना स्थानिक नागरिकांनी कामाच्या ठिकाणी येऊन काम बंद करण्यासाठी घोषणा दिल्या. याबाबत सुमारे 76 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी (दि.6) सकाळी साडेअकरा वाजता भामा आसखेड धरणावर घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार शेखर भास्कर कुलकर्णी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, पोलिसांनी सत्यवान लक्ष्मण नवले, रोहिदास पांडुरंग बांदल, गजानन हरिभाऊ कुडेकर, गणेश काळुराम जाधव, तुकाराम गोविंद नवले, देविदास सहादु जाधव, चंद्रकांत चंदू शिंदे, रोहिदास कोंडीबा कुरुळे, रोहिदास जाधव, चंद्रकांत पोपट चोरघे, शंकर महादू साबळे, बबन तुकाराम बेडुरे, चंद्रकांत सहादु डागले, दोडीभाऊ बळीराम शिंदे, शांताराम बारकू शिवेकर, किसन बळवंत नवले आणि इतर 50 ते 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामा आसखेड धरणातील पाणी पुणे महापालिकेत नेण्याचे काम सुरु आहे. धरणाच्या जॅकवेलपासून बंदिस्त पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. धरणातील पाणी नेण्यासाठी स्थानिक शेतकरी विरोध करीत आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना जमाव जमविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जमावबंदीचे आदेश असताना भामा आसखेड धरणातील पाणी नेण्यासाठी स्थानिक शेतक-यांनी बेकायदेशीररीत्या जमाव जमवून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

तसेच धरणातून पाणी नेण्यासाठी सुरु असलेले पाईप लाईनचे काम बंद करण्याची मागणी केली. रस्त्याच्या बाजूला उभे राहून कामाला विरोध केला.

याबाबत सुमारे 76 जणांवर मुंबई पोलीस कायदा कलम 135, भारतीय दंड विधान कलम 269, 188 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.