Chinchwad : पिंपरी-चिंचवड सायबर सेलला पोलीस ठाण्यांचे बळ
सायबर सेलसह प्रत्येक पोलीस ठाण्यातही असणार सायबर तज्ञ पोलीस
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात (Chinchwad) सायबर गुन्ह्यांनी डोके वर काढले आहे. डेबिट व क्रेडिट कार्ड, लिंकद्वारे बॅंक खाते हॅक करणे, लोन ऍप, सेक्सटॉर्शन यानंतर आता टास्कच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील आठ महिन्यात ऑनलाइन टास्कच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी तब्बल सहा कोटींची फसवणूक केली आहे. या वाढत्या गुन्ह्यांचा विचार करता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर सेलला मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सायबर सेलचे नुतनीकरण केले आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात असलेल्या सायबर सेलमध्ये पाच अधिकारी आणि कुशल 10 कर्मचारी आहेत. या सायबर सेलकडे तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. हा ताण कमी करण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर ‘सायबर स्क्वाड’ नेमण्यात आले आहे. यामध्ये एक अधिकारी आणि तीन कर्मचारी आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 18 पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. यामध्ये 72 पोलीस सायबर स्क्वाड म्हणून काम करत आहेत. यात 18 अधिकारी आणि 54 कर्मचारी काम करीत आहेत.
सायबर गुन्ह्यांशी निगडीत नागरिकांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवून तिथेच त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निवडक आणि किचकट गुन्हे पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती सायबर सेलकडे पाठवले जातील.
सायबर गुन्हेगारांकडून व्हाटस अपच्या माध्यमातून (Chinchwad) नागरिकांना संपर्क केला जातो. आमच्या कंपनीच्या युट्युब चॅनल वरील पोस्ट लाईक केल्यास पैसे मिळतील, असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे नागरिकांच्या खात्यात किरकोळ रक्कम जमा देखील केली जाते.
व्हिडीओ लाईक केल्यास, तसेच चॅनल सबस्क्राईब केल्यास पैसे मिळतात अशी खात्री झाल्यानंतर त्यांना टेलिग्राम या सोशल मिडीयावर काही टास्क दिले जातात. अधिक पैसे कमवायचे असतील तर प्रीपेड टास्क आहेत. ते पूर्ण केल्यास तुम्हाला अधिक रक्कम मिळेल, असे आमिष दाखवले जाते.
Pune : कलापिनी कुमारभवनच्या मुलांनी खास जवानांसाठी तयार केल्या राख्या
फसवणूक झालेल्यांमध्ये बहुतांशजण हे उच्चशिक्षित तर काहीजण संगणक अभियंताही आहेत. विश्वास संपादन करून प्रीपेड टास्क पूर्ण करण्यास सांगितले जाते. काही टास्क पूर्ण केल्यानंतर आणखी पुढचे टास्क दिले जातात. पुढील टास्क पूर्ण केले नाहीत तर आतापर्यंत गुंतवलेले सर्व पैसे बुडतील, अशी भीती दाखवले जाते.
त्यामुळे काहीजण नाईलाजाने पैसे मिळतील या आशेने ते टास्क पूर्ण करतात. मात्र त्या नंतर नागरिकांशी संपर्क तोडला जातो. फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. या प्रकारांमध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणींची फसवणूक होण्याचे प्रमाण जास्त आहे.
दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सायबर सेलवर कामाचा प्रचंड ताण येऊ लागला आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सायबर स्क्वाड पोलीस स्टेशन स्तरावरून सायबर सेलला मदत करणार आहे.