एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 134 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दररोज कारवाईचे सत्र सुरू असतानाही नागरिक पोलिसांच्या कारवाईला न जुमानता घराबाहेर फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू असताना कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवा घेण्यासाठीच घराबाहेर पडता येणार आहे. असे असतानाही विनाकारण घराबाहेर पडून नागरिक साथीच्या रोगाचा धोका वाढवत आहेत. त्यामुळे पोलिस देखील अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत आहेत.

गुरुवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 134 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर देहूरोड पोलिसांनी मुंबई जुगार कायद्यान्वये एक गुन्हा दाखल केला आहे. वाकड, देहूरोड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक तर दिघी पोलीस ठाण्यात दोन असे एकूण पाच गुन्हे मुंबई पोलीस कायद्यान्वये नोंदविण्यात आले आहेत.

गुरुवारी केलेली कारवाई –

आळंदी – 09

हिंजवडी – 30

देहूरोड – 19

एमआयडीसी भोसरी – 02

भोसरी – 18

चाकण – 20

दिघी – 30

तळेगाव दाभाडे – 06

एकूण – 134