Smart City News: स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवडची घसरण,  मिळाला 41 वा क्रमांक

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये पिंपरी-चिंचवड शहराची घसरण झाली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहर 41 व्या क्रमांकावर फेकले गेले आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशातील 100 शहरात पिंपरी – चिंचवड 69 व्या क्रमांकावर होते. मे महिन्यात 19 व्या क्रमांकावर होते. तर, जानेवारी 2021 मध्ये जारी करण्यात आलेल्या स्मार्ट शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड थेट 41 व्या क्रमांकावर गेले आहे.

रँकिंगसाठी विविध प्रकारचे निकष गृहीत धरण्यात येतात. स्मार्ट सिटी प्रकल्पावरील खर्च, प्रकल्पाची प्रगती, कार्यादेश, निविदा प्रक्रिया, प्राप्त निधीचा खर्च, महापालिकेचा परफॉर्मन्स अशा बाबींचा यात समावेश असतो.

राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या पुणे शहराचा देशात 18 वा क्रमांक आहे. नाशिक 20, ठाणे 23 तर पिंपरी – चिचवड 41 व्या क्रमांकावर आहे. पिंपरी – चिंचवडच्या तुलनेत इतर शहरांची कामगिरी चांगली आहे.

प्रकल्प रखडल्याचा फटका पिंपरी-चिंचवडला बसला आहे. स्मार्ट सिटी योजनेत इतर शहरांचा दुस-या टप्प्यात, तर पिंपरी-चिंचवडचा तिस-या टप्प्यात समावेश झाला. मार्च 2018 मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत 1155 कोटी रूपये खर्चाच्या वेगवेगळ्या स्मार्ट योजना शहरात राबविण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.