Pimpri corona News: शहरात कोरोनाच्या साडेचार लाख चाचण्या पूर्ण

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संसर्गाचे निदान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने चार लाख 29 हजार 693 जणांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यामध्ये 99 हजार 515 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, तीन लाख 26 हजार 879 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोना चाचण्यांचे वाढवलेले प्रमाण ही कोरोना लढ्यातील सर्वांत महत्वाची बाब असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. त्यामुळे अहवाल येण्यास देखील विलंब होत होता. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रसार वाढत होता. प्रादुर्भावचा धोका वाढत असल्याने पालिकेने भोसरीतील नारी संस्थेतही चाचण्या सुरु केल्या.

महापालिकेने वायसीएम रुग्णालयात देखील प्रयोगशाळा सुरु केली. खासगी प्रयोगशाळांनाही चाचण्या करण्याची परवानी दिली. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढले. अर्ध्या तासात चाचणी अहवाल देणा-या रॅपिड अँटिजेन चाचण्याही केल्या. कोरोनाचे निदान होण्यासाठी त्याचाही मोठा उपयोग झाला. आजपर्यंत चार लाख 29 हजार 693 जणांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यामध्ये 99 हजार 515 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात शहराबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. तर, तीन लाख 26 हजार 879 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढले

पालिकेने जुलै महिन्यात 76 हजार 451 जणांच्या चाचण्या केल्या. त्यातील 20 हजार 471 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. तर, 55 हजार 980 जणांचे निगेटीव्ह आले. ऑगस्टमध्ये 1 लाख 9 हजार 265 जणांच्या चाचण्या केल्या. त्यातील 30 हजार 739 पॉझिटीव्ह तर 75 हजार 181 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले.

सप्टेंबरमध्ये 1 लाख 13 हजार 110 जणांच्या चाचण्या केल्या. त्यातील 33 हजार 360 पॉझिटीव्ह तर 79 हजार 750 जणांचे निगेटीव्ह आले. ऑक्टोबरमध्ये 77 हजार 833 जणांच्या चाचण्या केल्या. त्यातील 10 हजार 941 पॉझिटीव्ह तर 66 हजार 938 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. नोव्हेंबरमध्ये कालपर्यंत 53 हजार 34 चाचण्या केल्या. त्यापैकी 4004 पॉझिटीव्ह तर 49 हजार 30 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.