Pune: सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ? : चंद्रकांत पाटील

पंतप्रधानां बाबतच्या त्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा टोला

एमपीसी न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी इंदापुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याविषयी बोलताना ‘ ते आपल्या कामाचे कौतुक करण्यासाठी पुण्याला येत आहेत’ असे विधान केले होते. त्यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘त्या स्वप्नात आहेत का’ असा उपरोधिक टोला  लगावला आहे. 

समता दिनानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी भिडेवाडा या ठिकाणी जाऊन महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, महात्मा फुले, आयुष्यभर महिला आणि शेतकऱ्यांसाठी झटत राहिले. पण अजूनही महिला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळताना दिसत नाही. वर्षभरात शेतकरी प्रचंड संकटात आहे. अतिवृष्टी झाल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही.

महिला शिक्षणाच्या बाबतीत आजही अनास्था दिसून येते. महिलांना आजही शिक्षण घेता येत नाही. घरातील वेगवेगळ्या कारणामुळे त्यांच्या शिक्षणाला ब्रेक मिळतो. महिलांवरील अन्याय अत्याचारात देखील भयानक वाढ झाली आहे. अन्याय अत्याचाराच्या भीतीमुळे शाळा महाविद्यालय सोडण्याचं प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकरीं आणि महिला समोरील अडचणी दूर झाल्या तर महात्मा फुलेंना हीच खरी आदरांजली ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.