Pimpri Corona News : ‘होम आयसोलेशन’ बंद; संस्थात्मक विलगीकरणावर भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कोविड बाधित रुग्णांना गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) न करता सर्व रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जाईल. संस्थात्मक विलगीकरण करतांना संबंधित रुग्ण राहत असलेल्या निवासी सोसायट्यांमध्ये त्यांच्या मालकीच्या क्लबहाऊस /इतर हॉलमध्ये असलेल्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल केले जाणार आहे.

याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केले आहेत.

महापालिकेच्या वॉर्डस्तरीय स्थापन केलेल्या 32 वॉर्ड कोविड सेंटरमध्ये दाखल करणे, रुग्णाने स्वेच्छेने खाजगी हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या हॉटेलमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणेस अनुमती मागितल्यास परवानगी देणे, महापालिका स्तरावर स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करणे, अपवादात्मक परिस्थितीमध्ये उदा. गरोदर माता, दिव्यांग व्यक्ती, बेडरिडन व्यक्ती, लहान मुलांची देखभाल करणारा दुसरे कोणी नसणारा एकमेव पालक आदींना वैद्यकीय अधिका-यांकडून तपासणी करुन गृहविलगीकरणाची परवानगी देणे असे पर्याय दिले जातील.

सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक (रुग्णालये व दवाखाने) यांनी कोविड संशयित रुग्णांची (Suspect Case) व कोविड बाधित रुग्णाची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक राहील. ‘मी जबाबदार’ ऍपमध्ये सदर रुग्णांची नोंद करणे बंधनकारक राहील.

याबाबतचा Login ID/ Password पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून देण्यात येईल. कोविड बाधित किंवा लक्षणे असणा-या संशयित रुग्णास खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी गृहविलगीकरण न करता संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine)करणे बंधनकारक राहील.

याबाबत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी संबंधित क्षेत्रातील महापालिकेच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिका-यांशी समन्वय ठेवून सदर रुग्ण गृहविलगीकरण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि त्यांना वॉर्ड कोविड सेंटर(WCC) कडे पाठविले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.